
महे येथील उपसरपंच विरूद्ध अविश्वास ठराव मंजूर.
महे उपसरपंचांविरूद्ध अविश्वास ठराव मंजूर
कसबा बीडः महे (ता.करवीर) उपसरपंच रूपाली युवराज बोराटे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. अविश्वास ठराव मंजूर होण्याची गावातील ही पहिलीच घटना आहे. सभेसाठी अकरा सदस्यांपैकी १० सदस्य हजर होते. एक महिला सदस्या स्वप्नाली हुजरे या अनुपस्थित होत्या. सरपंच सज्जन पाटील यांनी अविश्वास ठराव मांडला. त्याला सर्जेराव जरग यांनी अनुमोदन दिले. ठराव मांडताना सरपंच सज्जन पाटील यांनी ग्रामपंचायतीची माहिती सोशल मीडियावर टाकणे, ग्रामस्थांना माहिती अधिकार अंतर्गत तक्रार दाखल करण्यास सांगणे, असे आरोप केले. त्याला उत्तर देताना रूपाली बोराटे यांनी आक्रमक भूमिका घेत वरील सर्व आरोप फेटाळून लावले. त्या म्हणाल्या, ‘माझ्या वरील सर्व आरोप राजकीय द्वेषाने प्रेरीत आहेत. माझ्या दोन वर्षांच्या कालावधीत गावाच्या आर्थिक विकासाकडे लक्ष दिले आहे.’ यावेळी मंडल अधिकारी प्रवीण माने, तलाठी शुभांगी डोंगरे, ग्रामसेवक तब्बसूम अत्तार, विजय गुरव, सुभाष कांबळे, पोलीस पाटील इंदूमती हुजरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.