
कोरोची सरपंचांच्या निवडीला आव्हान
कोरोची सरपंचांच्या निवडीला आव्हान
---
सरपंचपदाच्या उमेदवारांच्या बैठकीत निर्णय; नोटिशीला न्यायालयामार्फत उत्तर
कबनूर, ता. ८ ः कोरोची (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच डॉ. संतोष भोरे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय काल (ता. ७) श्री मारुती मंदिर येथे झालेल्या सरपंचपदाच्या सात पराभूत उमेदवारांच्या बैठकीत घेण्यात आला.
डॉ. भोरे यांनी पाठविलेल्या नोटिशीला न्यायालयामार्फत उत्तर देणे, तसेच त्यांनी निवडणूक विभागास अतिक्रमणाबाबत दिलेल्या चुकीच्या माहितीविरोधात तक्रार देण्याचे ठरले.
सॅम आठवले म्हणाले, की सरपंचपदासाठी डॉ. भोरे यांच्यासह देवानंद कांबळे, लखन कांबळे, संतोष वाघेला, राजेंद्र कसबे, सतीश माने, निखिलराज आवळे व सचिन ऊर्फ सॕम आठवले असे आठ उमेदवार निवडणूक रिंगणात होतो. उमेदवार अर्ज छाननीवेळी डॉ. भोरे यांच्या अतिक्रमणावरून त्यांचा अर्ज छाननीत बाद ठरणार, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही. आठही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. डॉ. भोरे हे सरपंचपदी निवडून आले. यानंतर सर्व ठीक असताना डॉ. भोरे यांनी आमच्याविरोधात जिल्हाधिकारी न्यायालयात कॕव्हेट दाखल केले. त्यामुळे आता त्यांच्या निवडीला आव्हान द्यायचेच, असे ठरले. या वेळी सात पराभूत उमेदवारांनी प्रतिक्रिया दिल्या.
नरसू पाटील, आनंदा लोहार, सुहास पाटील, शांतिनाथ पाटील, संजय खारकांडे, भय्या पिष्टे, रवी कांबळे, पिंटू सुतार, संजय कदम, किशोर जगताप, दयानंद कांबळे, सचिन कारले आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गिरिधर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ताराराणी भाजप आघाडीचे पॅनेलप्रमुख अभिनंदन पाटील यांनी आभार मानले.
-----------------
मला जनतेने निवडून दिले आहे. माझा विजय काही जणांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे माझ्या निवडीला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू आहेत. म्हणून पूर्व खबरदारी म्हणून मी कॅव्हेट दाखल केले आहे. माझा कुणाबाबतही आकस नाही.
- डॉ. संतोष भोरे, सरपंच, कोरोची