
शिवडाव - सोनवडे घाट मार्ग आंदोलन चिघळणार
सोनवडे घाट मार्गाबाबत
ठोस निर्णय नाहीच
कणकवलीत बैठक; आंदोलक आंदोलनावर ठाम
कडगाव, ता. २४ : कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा शिवडाव-सोनवडे घाट मार्गाचे काम प्रत्यक्षात चालू व्हावे या मागणी करिता २६ जानेवारी रोजी घाट पायथ्याशी आत्मदहनाचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. या अनुषंगाने कणकवली येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बैठक झाली. मात्र या वेळी कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम राहिले. यामुळे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजयकुमार सर्वगोड, वन विभागाचे अधिकारी व मोनार्च कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
सदरचा घाट रस्ता गेले ४५ वर्षे प्रलंबित आहे. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने बैठक बोलवून लेखी आश्वासन देऊन आंदोलन थांबवण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. आंदोलकांतर्फे डॉ. संदीप नाटेकर, लॉरेन्स माननेकर, शैलेंद्र उळेगड्डी, शशिकांत पाटील, नारायण गावडे, सुभाष मडव, दिलीप तवते, दादा साहिल, लहू कुडतरकर यांनी भूमिका मांडली.
या वेळी अधिकाऱ्यांकडून गत वेळी झालेले अलाइनमेंट हे चुकीचे झाल्याने नवीन अलायमेन्टचा प्रस्ताव असून एक वर्षाच्या आत नवीन अलाइनमेंट व सर्व परवानगी घेऊन रस्ता मार्ग कार्यान्वित होण्याकरिता विशेष प्रयत्न करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम अभियंता अजय कुमार यांनी दिले. मात्र आंदोलन कर्त्यांना नवीन अलाइनमेंट व आणखीन ९० हेक्टर जमीन संपादित करण्याचे कारण समजताच सर्वजण आक्रमक होऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले.
या प्रक्रियेमुळे हा घाट पुन्हा शासनाच्या लालफितीत अडकण्याची शक्यता असल्याने २६ जानेवारी रोजी घाट पायथ्याशी आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी ठरविले. एक कमिटी करून सनदशीर मार्गाने आंदोलन, कायदेशीर लढाई आदी सर्वच स्तरावर लढाई लढण्याचे निश्चित करण्यात आले.
या वेळी गणेश बुटाले, पी. डी. सावंत, अमित मडव, घोडगेचे सरपंच ढवळ, सुरेश कांबळे, महेश कांबळे, एम. बी. देसाई, रामदास देसाई, सचिन देसाई, विक्रम केंजळेकर, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.