प्रश्न कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरणाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्न कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरणाचा
प्रश्न कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरणाचा

प्रश्न कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरणाचा

sakal_logo
By

लोगो : कोल्हापूर-गगनबावडा रस्ता रुंदीकरण

03251

दोनवडे, बालिंग्यात सहा मोऱ्या करा
अन्यथा काम बंद; सरपंच, शेतकऱ्यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

कुंडलिक पाटील
कुडित्रे, ता. २२ : रस्त्याची समान पातळी करण्यासाठी दोनवडे-बालिंगा दरम्यान दोन मीटरने रस्त्याची उंची वाढविण्यात येणार आहे. यामुळे करवीर तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसेल. दोनवडेच्या बाजूला चार, बालिंगाच्या बाजूला दोन मोऱ्या कराव्यात, अशी मागणी सरपंच व शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली. मागणीचे निवेदन मधुकर जांभळे, राजेंद्र सूर्यवंशी, तानाजी मोरे व सर्व सरपंचांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता के. डी. बुधाळे यांना दिले. दै. ‘सकाळ’मधून रुंदीकरण आणि पूर प्रश्नाबाबत सातत्याने वार्तांकन झाल्यानंतर आज सरपंचांनी एकत्र येऊन पंचायत समितीत प्राथमिक बैठक घेऊन, कार्यकारी अभियंत्यांबरोबर बैठक घेतली.

निवेदनानुसार रस्त्याची उंची वाढल्यास २५ गावांना पुराचा फटका बसेल. यामुळे दोनवडेच्या बाजूला चार व बालिंगाच्या बाजूला दोन मोठ्या मोऱ्या कराव्यात, गगनबावडा ते राधानगरीदरम्यान पाच नद्यांचे पुराचे पाणी भोगावती, पंचगंगा नदीत मिसळते. २०१९ व २०२१ मध्ये येथे भोगावती, पंचगंगा नदीला महापूर आला होता. यामध्ये शेतीचे व घरांचे नुकसान झाले होते. याचा विचार खात्याने करून नागरिकांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे. दोन दिवसांत मागणीनुसार मोऱ्या कराव्यात, अन्यथा जनआंदोलन उभारून रुंदीकरणाचे काम बंद पाडू.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाबाबत दिल्लीत निर्णय होतात. यामुळे शेतकऱ्यांची मागणी वरिष्ठांना कळवितो, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी खासदारांना निवेदन देऊ, असे सांगितले. यावेळी दोनवडे सरपंच सर्जेराव शिंदे, पाडळी सरपंच तानाजी पालकर, महे सरपंच सज्जन पाटील, बालिंगा माजी सरपंच मयूर जांभळे, चंद्रकांत पाटील, तानाजी मोरे, सचिन सोहनी, वसंत पाटील, रामचंद्र पोवार, विजय पाटील, सारंग सातपुते, धनाजी पाटील, विजय जांभळे व ग्रामस्थ उपस्थित होते.


कोट
मोऱ्यांचे प्रमाण वाढवणे व जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. दोनवडे बाजूला जुनी आणखी नवीन एक मोरी करणार आहे. नागरिकांच्या मागण्या आम्ही वरिष्ठांना कळवितो.
- के. डी. बुधाळे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

चौकट
अडचणीत आणणारा विकास नकोच....
दोनवडे-बालिंगा पूलदरम्यान रस्त्याला उतार आहे. हा उतार कमी करण्यासाठी रस्त्याची लेव्हल करण्यासाठी सहा फूट रस्त्याची उंची काही ठिकाणी वाढवली जाणार आहे. यामुळे महापुराचा धोका आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी संपूर्ण रस्ता सहा फुटांनी वाढणार नसून काही ठिकाणी लेवल काढण्यासाठी रस्ता वाढेल. वाढलेल्या रस्त्याचा पुराशी संबंध राहणार नाही, असे सांगताच शेतकरी आणि गाव अडचणीत आणणारा विकास नकोच, असे नागरिकांनी ठणकावले.