

लेख
संघर्षशील नेतृत्व
समाजकारणातून पुढे आलेले सामान्य कार्यकर्त्यांचे, संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व म्हणजे आमदार चंद्रदीप नरके. त्यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभेला तिसऱ्यांदा विजय झाला. संघर्षातून मिळालेल्या या विजयानिमित्त....
-----------------------------------
स्व .डी. सी. नरके समाजकारणी होते. त्याकाळी दुष्काळी परिस्थिती असताना डी. सी. नरके यांनी कुंभी-कासारी कारखान्याच्या माध्यमातून परिसरात आर्थिक, हरितक्रांती घडविली. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी व शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. पुढे चंद्रदीप नरके हे ‘एनएसयूआय’च्या माध्यमातून विद्यार्थिदशेपासूनच कार्यरत झाले. त्यामुळे संघटनेच्या विविध उपक्रमांतून तळागाळातील माणसांपर्यंत ते पोहोचले. शिक्षण दशेपासून आतापर्यंत त्यांच्या वाट्याला संघर्ष आला. एकवेळ विधानसभेचा अपवाद वगळता त्यांना नेहमी विजय प्राप्त झाला आहे. कुंभी कासारी साखर कारखान्याची सत्ताही सभासदांनी एकहाती माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे सोपवली. आता जनतेने त्यांना तिसऱ्यांदा विधानभेत नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. पद नसताना त्यांनी विकास केलाच. आतातर मतदारसंघाचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करतील यात शंका नाही.
कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यात ते आले आणि सभासदाभिमुख कारभार करतानाच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. सभासदांच्या मुलांना कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत प्रोत्साहन मिळण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबविले. साहजिकच नावाजलेले पैलवान असोत किंवा नेमबाज या कुंभी खोऱ्यातून घडू लागले. ‘कुंभी’वर पैलवान युवराज पाटील कुस्ती संकुल उभा केले. आज येथे सभासदांची शेकडो मुले, मल्ल कुस्तीचे, करिअरचे धडे गिरवत आहेत, हे कौतुकास्पद आहे.
कुंभी सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी काही काळ सांभाळली. यामुळे शेतकऱ्यांना पतपुरवठा झाला आहे. एकीकडे साखर कारखान्याच्या आदर्श कारभाराबरोबरच आदर्श समाजकारण सुरू असताना कार्यकर्त्यांतून त्यांना विधानसभा लढविण्याचा आग्रह सुरू झाला. केवळ कारखाना कार्यक्षेत्रापुरते त्यांचे कार्य मर्यादित न राहता संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट झाला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती .कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी चंद्रदीप यांनी हे शिवधनुष्य पेलायचे ठरवले आणि गेली काही वर्षे मतदारसंघात त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. गाव अन् गाव त्यांना तोंडपाठ असून आता तर त्यांना मतदारसंघाची नाळ सापडली आहे.
लोकांचे प्रश्न ते समजावून घेऊ लागले. त्यातून सर्वत्र सुरू असलेले विजेचे भारनियमन आणि त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट त्यांना जिव्हारी लागली. शेतीपंपांना अखंड वीजपुरवठा मिळण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी हद्द वाढीला त्यांनी सातत्याने विरोध केला आहे. पुढे टोल हाणून पाडला. ही मागणी घेऊन त्यांनी जनआंदोलन उभारले आणि बघता बघता त्यांच्या मागे सारा मतदारसंघ उभा राहिला.
सकस समाजनिर्मितीसाठी अध्यात्मातील विज्ञान आणि त्यातून आदर्श जीवनशैली प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे, हा त्यांचा हेतू. त्यामुळे त्यांनी प्रसिद्ध प्रवचनकार बाबामहाराज सातारकर यांची प्रवचनमालाही आयोजित केली.
राज्य साखर संघात संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. जिल्ह्याचा प्रादेशिक आराखडा तयार करताना अनेक अडचणी होत्या. त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. जिल्ह्याच्या, मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेत सातत्याने सर्व क्षेत्रांवर त्यांनी प्रश्न मांडले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आणि गोकुळच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांना संधी देऊन कार्यकर्त्यांना पुढे आणले आहे.
बारा वर्षे धामणी प्रकल्पाचा प्रश्न रखडला. त्यांनी पुढाकार घेऊन सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन बजेट लावून घेतले. पुढे २००९ मध्ये विधानसभेचे पडघम वाजू लागले. मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आपल्याला खमके नेतृत्व मिळाले असून हे नेतृत्व विधानसभेत गेले पाहिजे, असा ठाम निर्धार केला. शिवसेनेचे धनुष्यबाण घेऊन ते रिंगणात उतरले आणि विजयीही झाले. त्यांचा हा विजय म्हणजे सामान्यांनी करवीर मतदारसंघात आणलेले रयतेचे राज्यच आहे.
पुढे २०१४ मधेही विधानसभा जिंकून मतदारसंघाचा विकास त्यांनी साधला.पुन्हा एकदा २०२४ च्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना लाभ मिळवून दिला. सर्व घटकांचा विकास साधत मतदारसंघात संपर्क व विकासकामांच्या जोरावर तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा..
सकाळी सातपासून रात्री-अपरात्रीपर्यंत जनतेत मतदारसंघात थांबून काम करणारे, तसेच प्रत्येक कुटुंबाशी नाळ जोडलेला प्रतिनिधी म्हणून आम. नरके यांच्याकडे पाहिले जाते.
चौकट..
विकासकामांतील ‘चंद्रदीप’
ग्रामीण भागातील जनतेला शहरात येण्यासाठी व शेतीमालाला विक्रीसाठी टोल अडचणीचा होता. आमदार नरके यांनी शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न पाहून टोलचे आंदोलन करून टोल हद्दपार केला. मतदारसंघात कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून रस्ते, वीज, पाणी सुविधा करून वाड्या-वस्त्या दळणवळणाने जोडल्या.
क्रीडाक्षेत्रावर भर देत तरुण पिढीचे करिअर घडविण्यावर भर देत कुस्ती, नेमबाजी, फुटबॉल असे गेम सुरू केले आहेत. मतदारसंघात अनेक ठिकाणी मोठे पूल मंजूर करून पावसाळ्यात पुरामुळे होणारी अडचण दूर केली आहे. नरके यांनी कुंभी कारखान्यावर सत्ता कायम ठेवत ‘कुंभी’चा व सभासदांचा विकास साधला. ‘कुंभी’वर निवासी शाळा सुरू करून ऊस उत्पादक सभासदांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा मोलाचा वाटा नरके यांनी उचलला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.