कागल : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्‌घाटन
कागल : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्‌घाटन

कागल : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्‌घाटन

sakal_logo
By

04670

आजच्या मुलांबरोबर अपडेटच राहावे लागेल
सुहासिनीदेवी घाटगे; कागलला ५० वे तालुका विज्ञान प्रदर्शन

कागल, सेनापती कापशी ता. १८ : सध्याच्या मुलांसंदर्भातील संकल्पना बदलाव्या लागतील. त्यांच्या बरोबरीने राहायचे असेल तर अपडेट राहावे लागेल. रिमोट कंट्रोलने उद्घाटन आणि विद्यार्थ्याच्या तोफेची सलामी हे विज्ञान प्रदर्शनाचे विशेष आहे, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व्हन्नूर (ता.कागल) येथील दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयातील डॉ.एपीजे अब्दुल कलाम दौलत विज्ञाननगरीत होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगांवकर, ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा वसंतराव निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार आसगांवकर म्हणाले, ‘बालवैज्ञानिकांनी बनवलेल्या नावीन्यपूर्ण उपकरणांचे पेटंट बनविण्यासाठी सर्व सहकार्य करू.’ माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर म्हणाले, ‘पुस्तकांपासून लांब जाणारी पिढी पुन्हा पुस्तकाकडे वळण्यासाठी शाळारूपी संस्कार केंद्र चालवणाऱ्या शिक्षकांनी वाचनालये समृद्ध करावीत. विज्ञान सोप्या पद्धतीने सांगणारी ‘वर्किंग मॉडेल्स’ तयार करावीत.’
विज्ञान प्रदर्शन समिती कार्यवाह मुख्याध्यापक व्ही. जी. पवार यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात डॉ. कमळकर यांनी विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व विशद केले. यावेळी सरपंच पूजा मोरे, शीतल नवाळे (पिंपळगांव), शिक्षण विस्ताराधिकारी आर. एस. गावडे , सौ. सारिका कासोटे, जिल्हा शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, केंद्रप्रमुख सुनीता किणेकर, आर. डी. कोंडेकर उपस्थित होते.
दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर लिखित ''ऑनलाईन शिक्षणपद्धती'' ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी दैनंदिन व्यवहारात वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणल्यास विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. आज ग्रंथदिंडी, प्रश्नमंजूषा, ग्रंथ प्रदर्शन व परीक्षण झाले. ग्रंथदिंडीच्या मार्गावर विज्ञानविषयक रांगोळी काढल्या होत्या. प्रदर्शनाच्या ठिकाणी ग्रंथदिंडी आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, गटविकास अधिकारी सुशील संसारेंसह अधिकाऱ्यांचा सहभाग होता. दिंडीत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासह वैज्ञानिकांच्या वेशभूषा केल्या होत्या.
प्रदर्शनात यावर्षी प्रथमच सात दिव्यांग विद्यार्थ्यांनी उपकरणे मांडली. सुलभ रोपलावण, रोटी मेकर, स्टेप लाईट, टोकणी यंत्र, सूक्ष्मदर्शी उपकरणांसह सहभाग घेतला. प्रदर्शनात इयत्ता ५ वीचे ३४, ६ वी ते ८ वी चे १३९, ९ वी ते १२ चे ७०, प्राथमिक शिक्षक ७ , माध्यमिक शिक्षक ११, प्रयोगशाळा सहाय्यकांचे ६ व दिव्यांग विद्यार्थ्यांनी ७ अशी २७४ उपकरणे आहेत.


चौकट
...तर शासन काय करणार?
विज्ञान प्रदर्शनासाठी शिक्षक, शाळांनी वर्गणी द्यावी लागते, हे दुर्दैवी आहे. मुलांच्या बौद्धिक आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी शिक्षकांना वर्गणी काढावी लागत असेल तर शासन काय करणार, असा सवाल आसगावकर यांनी उपस्थित केला. याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू. प्रशासकीय पातळीवर शिक्षणाधिकाऱ्यांनीही प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.