
कसबा बावड्यात चव्हाण पाणंद जवळ मृत मासे
04073, 04074
कसबा बावडा : येथील चव्हाण पाणंद परिसर नदीपात्रातील मृत मासे. दुसऱ्या छायाचित्रात नदीत मिसळणारे सांडपाणी. (छायाचित्र : प्रकाश पाटील)
कसबा बावड्यात
मृत माशांचा खच
पंचगंगा नदी प्रदूषण; पाण्याला दुर्गंधी
कोल्हापूर, ता. ४ : कसबा बावडा येथील चव्हाण पाणंद येथे पंचगंगा नदी पात्रात प्रदूषण वाढल्यामुळे नदीपात्रातील मासे मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आढळले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळत असल्याने हे मासे मृत झाल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. या सांडपाण्यामुळे नदीतील पाण्याला दुर्गंधी येत असून, पाण्यावर तेलकट तवंग आला आहे.
सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळते, त्याच ठिकाणी नदी काठाला मृत मासे जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. या दुर्गंधीयुक्त आणि प्रदूषित पाण्यामुळे जलचरांना धोका निर्माण होत असून, याचा मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. याबाबत प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
---------------
चौकट
सांडपाण्याने स्वच्छ पाणी गढूळ
कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये याच ठिकाणी स्वच्छ व नितळ पाणी पाहायला मिळत होते. नदीपात्रातील तळ आणि मासे सहज नजरेस पडत होते, पण सध्या प्रदूषणामुळे मासे मरण पावल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतात.
---------------
कोट
गेल्या अनेक वर्षांपासून नदीपात्रात सांडपाण्याचा धोका आहे. या पाण्यावर प्रक्रिया केली असली तरी काही अंशी होणाऱ्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
- रवींद्र साळोखे, नागरिक