
ईपीएस-९५ पेन्शनरांचा बुधवारी रास्ता रोको
ईपीएस-९५ पेन्शनरांचा
बुधवारी रास्ता रोको
कोल्हापूर, ता. १२ : केंद्र सरकारने एपीएफओ विभागातर्फे १९९५ साली ईपीएस-९५ ही स्कीम राबविली. त्याचा दृश्य परिणाम म्हणून सध्या बहुतांशी पेन्शनरना १००० ते ३००० रुपयांच्या दरम्यान पेन्शन मिळते आहे. सध्याच्या महागाईच्या काळात एवढ्या तुटपुंज्या रकमेत त्यांना जगणे मुश्कील बनले आहे. याच्या निषेधार्थ सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता. १४) कावळा नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष बंडोपंत किल्लेदार व शहराध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांनी शिवाजी मंदिर येथे झालेल्या बैठकीत दिली.
हा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी खासदारांना व संबंधित खात्याच्या मंत्र्यांना लेखी निवेदने व भेटीगाठी घेऊन संघटनेने आपले म्हणणे मांडले होते. पंतप्रधानांनी दोन वेळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून थोडा विलंब लागेल संयम ठेवा, असे आवाहन केले होते; परंतु अद्याप केवळ आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडलेले नाही. यासाठी बुधवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता महाराणी ताराराणी चौक, कावळा नाका येथे ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
दरमहा किमान ७५०० रुपये पेन्शन, अधिक महागाई भत्ता लागू करा, पेन्शनर कुटुंबीयास मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा द्या, योजनेपासून वंचितांना ५००० रुपये पेन्शन लागू करा व सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्शन लागू करा, अशा प्रमुख मागण्या या वेळी बैठकीत करण्यात आल्या.
बैठकीस सुरेश मगदूम, सुभाष सावंत, प्रकाश भोसले, राजाराम पाटील, निवृत्ती पाटील, उमेश कसबेकर, अमरसिंह पाटील, चंद्रकांत ऐनापुरे, प्रकाश महाडिक, सुरेश जाधव, रणजित सासने यांच्यासह ईपीएस-९५ संघर्ष समितीचे सर्व पेन्शनर व पदाधिकारी उपस्थित होते.