कंदलगाव .मान्सूनपुर्वची कामे अंतिम टप्प्यात.. महावितरण विभागाकडून नियोजन;दुरूस्तीसाठी बंद करावा लागतो वीजपुरवठा..

कंदलगाव .मान्सूनपुर्वची कामे अंतिम टप्प्यात.. महावितरण विभागाकडून नियोजन;दुरूस्तीसाठी बंद करावा लागतो वीजपुरवठा..

07947
मान्सूनपूर्वची कामे अंतिम टप्प्यात
महावितरण विभागाकडून नियोजन ; दुरुस्तीसाठी बंद करावा लागतो वीजपुरवठा

सकाळ वृत्तसेवा.

कंदलगाव, ता. ६ : पावसाळ्यामध्ये वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करता यावा, या दृष्टीने दरवर्षी महावितरणच्या वतीने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. यामध्ये विद्युत यंत्रणेला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, रोहित्रांची देखभाल त्याचबरोबर उपकेंद्रामधील दुरुस्ती आदी कामांचा समावेश असतो.
आर. के. नगर परिमंडळातील पाचगाव, गिरगाव, कंदलगाव व मोरेवाडी या परिक्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना आता वेग आला असून महावितरणचे कर्मचारी पूर्ण क्षमतेने देखभाल दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झालेल्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी रखरखात्या उन्हातही महावितरणचे कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत; परंतु विद्युत यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यासाठी त्या-त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतो. सर्व भागाचा वीजपुरवठा खंडित न करता टप्प्याटप्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती कामे केली जातात.

चौकट..
ही कामे आहेत सुरू.
पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ बंद राहू नये, यासाठी वीज वाहिनीला स्पर्श करत असलेल्या झाडाच्या फांद्या छाटणे, फुटलेले पीन इन्सुलेटर तपासणे व बदलणे, रोहित्रांची ऑईल पातळी तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वीज वाहिनीचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, वीज वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली करणे, जीर्ण झालेल्या वायर बदलणे, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व दुरुस्ती करणे, तसेच प्रत्यक्ष वेळेवर आढळणाऱ्या त्रुटी दूर करणे अशी कामे केली सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहेत.

चौकट..
ग्राहकांनी संयम राखावा
वाढत्या तापमानामुळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहेच. मात्र, देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी असून ग्राहकांनी वीजपुरवठा बंद असलेल्या काळात थोडासा संयम राखून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे सहाय्यक अभियंता मृणाल वाखणकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com