कोल्हापूर .व्यवसायीक जाहिरातबाजी पर्यावरणाच्या मुळावर.. खिळ्या-मोळ्यांनी वाढ झाडांची खुंटली..

कोल्हापूर .व्यवसायीक जाहिरातबाजी पर्यावरणाच्या मुळावर.. खिळ्या-मोळ्यांनी वाढ झाडांची खुंटली..

बिग स्टोरी..
प्रकाश पाटील

08112; 08111

जाहिरातबाजीचा खिळा पर्यावरणाच्या मुळावर

व्यावसायिक फलकांमुळे झाडांची वाढ खुंटली; पर्यावरणप्रेमींतून संताप

पर्यावरण रक्षणासाठी झाडांचे अतिशय महत्त्व असताना कोल्हापूर शहरासह परिसरात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांचा वापर जाहिरातीसाठी करण्यात येत आहे. यामध्ये हॉटेल व्यवसायिकांची संख्या जादा आहे. व्यवसायाची प्रसिद्धी आपल्या भागात सोडाच पण परिसरासह उपनगरात ही व्हावी. यासाठी व्यवसायाच्या ठिकाणापासून किमान पाच-सहा कि मी अंतरावरील झाडांवर झाडांना खिळे ठोकून,तारा गुंडाळून जाहिरात फलक लावले जात असल्याने झाडांना इजा पोचत आहे. अशा प्रकारामुळे रस्त्याकडेची झाडे नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
------------------------

मुख्य चौक, बस थांबे, इमारती आदी ठिकाणी जाहिरात नित्याचीच बाब असली तरी शहरासह उपनगर परिसर व मुख्य रस्त्यावरील झाडांवर खिळे ठोकून, तारा गुंडाळून अनेकजण जाहिरातबाजी करीत असल्याचे वास्तव आहे. त्याचबरोबर झाडांवर रंगबिरंगी व सहज नजरेत येतील अशा विविध रंगांच्या विद्युतरोषणाई सोडणे, झाडांना घातक कलर मारणे आदी प्रकारही वाढले आहेत. यामुळे झाड जिवंत राहण्यासाठी आवश्यक घटक व पाणी मुळांपासून झाडांच्या इतर भागात पोचण्यात अडथळे येतात.
अनेक वर्षांपासून अशा जाहितीसाठी व्यवसायिक रस्त्यावरील मोठ्या आणि उंच झाडांचा वापर केल्याने खिळ्यांमुळे झाडांची साल निघून झाडांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे झाडांचे आयुष्य कमी होते, असे वृक्षतज्ज्ञांचे मत आहे.

चौकट.
झाडे लावा..
एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा, वनसंपदेचे संवर्धन करा,’ अशा घोषणा देत पर्यावरण सुरक्षेचे धडे देते आहे. मात्र, दुसरीकडे याच झाडांवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करून व्यवसाय वाढवून झाडांचे मात्र नुकसान करीत आहेत. याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून कारवाई होत नसल्याची खंत पर्यावरण व वृक्षप्रेमींच्या मनात रुतली आहे.

या परिसरात फलक
कळंबा, आर. के. नगर, शाहू नाका, उचगाव, टेंबलाईवाडीसह शिये, शिरोली, कसबा बावडा, आंबेवाडी, बालिंगा, वाशी नाका यासह शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकून जाहिरातीचे लहान मोठे फलक लावले आहेत.

कायदा काय सांगतो..
वन विभागाच्या कायद्यानुसार झाडांवर खिळा मारणे, बोर्ड लावणे, झाडांना इजा होईल, असे कृत्य करणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे.तरी देखील राजरोसपणे मुख्य रस्त्यांच्या कडेला असे प्रकार घडत आहेत. संबंधित विभाग असे कृत्य करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई करत नाही, याची खंत वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

झाडांना खिळे ठोकल्याने...
झाडांची वाढ खुंटते, लाकूड निरोगी राहत नाही, बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता बळावते, झाड हळूहळू पोकळ होते, फळधारणा नष्ट होते, झाडांचे आयुष्य कमी होते, झाड वठते.

कोट.

विद्युत रोषणाईसह अन्य कारणांसाठी झाडांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आधीच शहर व परिसरातील रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल झाली आहे. तरीही वाचलेल्या झाडांना इजा करून जाहिरात फलक लावले जात आहेत. प्रसंगी झाडाच्या फांद्याही छाटल्या जात आहेत. यामुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कारवाई व्हावी.
- अमोल बुढ्ढे, वृक्षमित्र

झाडाला खिळे मारणे, वायरने फलक बांधणे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे. झाडाला खिळे ठोकणे, स्कू करणे, स्टेपल करणे झाडांसाठी वेदनादायी आहे. ते झाडांच्या खोडातील कॅबियमला छेदून जाते. कॅबियम हा झाडाच्या खोडातील वाढत्या उत्तीचा अतिशय पातळ प्रकार आहे. त्यांचे संवर्धन आणि संरक्षण तितकेच महत्त्वाचे आहे. झाडांचे पर्यावरणातील आणि मानवी जीवनातील महत्त्व लक्षात घेता धोरण ठरवणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी. झाडावर खिळे मारून फलक लावणे, वृक्षांचे बुंधे पेव्हर ब्लॉक, सिमेंट व डांबरमुक्त करणेही महत्त्वाचे आहे. मुळांनाही हवेची गरज आहे. जमिनीत पाणी मुरण्याची गरज आहे. याबाबत व्यापक मोहिमेची गरज आहे. - सुहास वायंगणकर; पर्यावरण अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com