
शालेय राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव
शालेय राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव
पेठवडगावमध्ये शनिवारपासून तीन दिवस आयोजन
खोची, ता. २१ ः राज्य कलाशिक्षक महासंघ, दि पिपल्स डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी पेठवडगाव व जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे २५, २६ व २७ फेब्रुवारीला पेठवडगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज मैदान येथे शालेय राजर्षी छत्रपती शाहू महोत्सव होणार आहे.
याचे उद्घाटन मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व खासदार धर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, राहुल आवडे, महासंघाचे राज्याध्यक्ष प्रल्हाद साळुंखे, राज्य उपाध्यक्ष रामचंद्र इकारे, प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद शिंदे, राज्य सहचिटणीस सुहास पाटील यांच्या उपस्थित होणार आहे. महोत्सवात सुमारे पाच हजारहून अधिक विद्यार्थी सहभाग घेतील असे नियोजन केले आहे, अशी माहिती महासंघाचे विभागीय अध्यक्ष धनाजी कराडे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनुले, दळवीज आर्टचे प्राचार्य अजय दळवी, कॉंग्रेसचे वक्ता विभाग जिल्हाध्यक्ष रणजितसिंह पाटील, सिद्धोजी माने, चित्रकार प्रा. अभिजित कांबळे, शिल्पकार अमित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कला-क्रीडा-सांस्कृतिक विषयात गोडी आणि आस्था निर्माण व्हावी यासाठी चित्रकला, हस्तकला, रांगोळी, नृत्य, नाट्य, गायन या विविध स्पर्धा, प्रदर्शन व प्रथितयश चित्रकार-शिल्पकार आणि नृत्य-नाट्य-गायन विशारद यांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहून अनुभवता यावी यासाठी महोत्सवाचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २५) चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धा (पाचवी ते आठवी) त्यानंतर शिल्पकार उत्तम साठे (पुणे) यांचे शिल्पकला (पोट्रेट) प्रात्यक्षिक, चित्रकार अभिजित कांबळे (कोल्हापूर) यांचे चित्रकला (पोट्रेट) प्रात्यक्षिक, दुपारी पारंपरिक खेळ प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण, सायंकाळी बक्षीस समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम (पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा). रविवारी (ता. २६) चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धा (बालवाडी ते चौथी) त्यानंतर चित्रकार प्रा. सत्यजित वरेकर (सांगली) यांचे चित्रकला (पोट्रेट) प्रात्यक्षिक, शिल्पकार अमित भिवदर्णे (कोल्हापूर) यांचे शिल्पकला प्रात्यक्षिक, मर्दानी खेळ प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण. दुपारी पारंपरिक खेळ प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण, सायंकाळी बक्षीस समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम (पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा). सोमवारी (ता. २७) चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धा (नववी ते महाविद्यालयीन गट) त्यानंतर सुमेध कुलकर्णी (मिरज) यांचे चित्रकला (निसर्गचित्र) प्रात्यक्षिक, शिल्पकार हर्षल कुंभार (कोल्हापूर) यांचे शिल्पकला प्रात्यक्षिक, मर्दानी खेळ प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण, दुपारी पारंपरिक खेळ प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण, सायंकाळी समारोप, बक्षीस समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम (पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा) होईल. दरम्यान, महोत्सवात चित्रकला, शिल्पकला व छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सहभागी कलाकारांनी कलाकृती २३ फेब्रुवारीपर्यंत प्रकल्प समन्वयक धनाजी कराडे यांच्याकडे जमा कराव्यात, असे आवाहन केले आहे.