कळंबा तलावातील मत्स्य उत्पादनात घट.. अनियमित पावसाचा फटका

कळंबा तलावातील मत्स्य उत्पादनात घट.. अनियमित पावसाचा फटका

02087; 79893

चार लाख मत्स्यबीजे धोक्यात
कळंबा तलाव पातळीत घट ः उपसाबंदीची गरज, मच्छीमार हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

कळंबा, ता. २५ ः अनियमित पाऊस व वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे कळंबा तलावातील मत्स्य उत्पादनात ३० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले असून यंदाच्या मत्स्य हंगामात त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान तलावातील पाणी पातळी सात फुटांवर पोचली असून पाणी उपसा तत्काळ बंद करण्याची गरज आहे; अन्यथा पाण्याविना चार लाख मत्स्यबीजे वाया जाणार असून जलचरांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.
देशातील सहा पेयजल योजनेत नैसर्गिक व शुद्ध पाणीपुरवठा करणारा तलाव म्हणून कळंब्याची ओळख आहे. तलावातील जलसाठा पावसाळ्यातील पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याबरोबर मत्स्य उत्पादनात तलावाचा लौकिक आहे. वर्षभर तलावात मच्छीमार मासेमारी करतात. कळंबा तलावामध्ये रोह, कटला, मिरगल, वाम, टिलाप, शेंगाळा, मरळ यासह अनेक जातींच्या माशांची पैदास मच्छीमार करतात. रंकाळा तलाव मत्स्यबीज केंद्र, हडपसर, पुणे व कर्नाटक येथून मत्स्यबीजे आणून तलावात सोडली जातात. त्यानंतर तीन ते चार वर्षे खाद्य पुरवून एक ते पाच किलोपर्यंत त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर मच्छीमार तलावात मासेमारी करून ग्राहकांना उपलब्ध करून देतात. गोड्या पाण्यातील माशांना विशिष्ट चव आहे. त्यामुळे खवय्यांची या माशांना अधिक पसंती आहे. तसेच हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ स्टॉल, किरकोळ विक्रेते व बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. दरम्यान कळंबा तलावातील जलसाठ्याला प्रदूषणाचा विळखा घट्ट होत आहे. वर्षभर पाणी उपसा केल्यामुळे पाणी पातळीत मोठी घट झाली असून तिन्ही बाजूंचे पात्र कोरडे पडले आहे. शिल्लक पाणी साठ्यातही गाळाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मत्स्यबीजासह जलचरांचा श्वास गुदमरणार आहे. त्यामुळे तलावातील पाणी उपसा तत्काळ बंद करण्याची मागणी होत आहे.

चौकट.
दहा मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह
येथे दहा कुटुंबांचा उदरनिर्वाह मासे विक्रीतून होत आहे. २१-२२ मध्ये अतिवृष्टीमुळे तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात मासे वाहून गेले. २०२३ मध्ये अनियमित पावसामुळे ऐन उन्हाळ्यात तलाव कोरडा पडला आहे. त्याचा मत्स्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अशा अनेक आस्मानी व सुलतानी परिस्थितीचा मच्छीमार सामना करत आहे.

कोट..
यंदा मत्स्य हंगामात कळंबा तलावातील माशांच्या उत्पादनात ३० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे यंदा मच्छीमारांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तलावात पाणीसाठा शिल्लक राहिला नाही तर जलचरासह चार लाख मत्स्य बीजांचा जीव धोक्यात येणार आहे.
- अंकुश ठोंबरे, मच्छीमार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com