कळंब्यातील कैदी फुलवणार शेतीचा मळा

कळंब्यातील कैदी फुलवणार शेतीचा मळा

94690

कळंबा कारागृहातील कैदी फुलवताहेत मळा
तीस एकर शेतीमधून ३२ टन भाताचे उत्पादन; वेलवर्गीय भाज्यांसह पालेभाज्याही

संजय दाभाडे ः सकाळ वृत्तसेवा

कळंबा, ता. ३ ः कळंबा कारागृहातील बंदीजनांनी कला-कौशल्याद्वारे उद्योग क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम केले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाला वर्षाकाठी दोन कोटींहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळत असून शासनालाही मोठा महसूल मिळत आहे. त्यामुळे राज्यात या कारागृहाचे उपक्रम आदर्शवत ठरले आहेत. त्याचबरोबर कारागृहाच्या शेतीमध्ये बंदीजनांचे हात राबू लागले असून तीस एकरामध्ये शेतीचा मळा फुलणार आहे. त्यामध्ये भात शेतीसह अनेक जातीच्या पालेभाज्यांची लागवड करण्यात येत आहे. दरम्यान कारागृह मालकीच्या पद्माळा परिसरात गेले अनेक वर्षे पडिक असलेल्या शेतीमध्ये चिखलगुट्टा करून भाताची रोपे लावण्यासाठी कैद्यांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. या शेतीसाठी सांडपाण्याचा प्रामुख्याने उपयोग होत आहे.
रोहिणी नक्षत्रापासून कळंबा कारागृहात खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. कारागृह व पद्माळा परिसरातील ३० हेक्टरहून अधिक क्षेत्रामध्ये साठ बंदीजनांच्या मदतीने खरीप हंगाम पूर्वमशागतीचे काम प्रशासनाने पूर्ण केले आहे. भाताच्या रोप लागवडीसाठी कारागृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या शेतीमध्ये भात रोपांची नर्सरी तयार करण्यात आली असून त्यासाठी भाताच्या संकरित बियाण्यांचा वापर केला आहे. येथील शेतीमध्ये बांध घालून ट्रॅक्टरने चिखलगुट्टा तयार करून त्यामध्येही भाताची रोपे लावण्यात येत आहेत. या शेत पिकासाठी पावसाच्या पाण्याबरोबर परिसरातील सांडपाण्याचाही प्रामुख्याने वापर केला आहे. दरम्यान भाताचे अधिक उत्पादन व्हावे यासाठी निर्मल सीड्स कंपनीचे संकरित बियाणे एनपीएच ३० वापरले आहे. यंदाच्या खरीप हंगामात २२ एकरांमध्ये भातशेती केली जाणार आहे. चार एकरांमध्ये दुधी भोपळा, डांगर भोपळा, भेंडी, टोमॅटो, नवलकोळ, मिरची, कोथिंबीर अशा विविध जातीच्या वेलवर्गीय व पालेभाज्या घेतल्या जाणार आहेत. कारागृहातील गुरांसाठी चार एकरांमध्ये चारा पीक घेतले जाणार आहे. त्यामुळे सकाळी आठपासून शेतीमध्ये बंदीजनांचे हात राबताना दिसत आहेत. उत्पादन वाढीसाठी शेतीतज्ज्ञाकडून या बंदीजनांना शेतीविषयक मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाद्वारे शेत पिकांच्या पेरणीची माहिती दिली जात आहे. कारागृहाच्या शेतीमधून दोन ते अडीच महिने पुरेल इतका तांदूळ उपलब्ध होत आहे.तसेच भाजीसाठी दुधी भोपळा, भेंडी, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची व अन्य पालेभाज्यांचे चांगले उत्पादन मिळत आहे. कारागृहामध्ये त्याचा वापर केला जात आहे.

चौकट..
बंदीजनांची संख्या - दोन हजारांहून अधिक
रोज आहारासाठी तांदूळ ८०० किलो
चपातीसाठी गहू ७०० किलो
जेवणातील भाजी ५०० किलो

कोट
कारागृहातील तीस एकर शेतीमधून ३२ टन भाताचे उत्पादन मिळत आहे. पालेभाज्या व गुरांना चारा मिळत आहे. बंदीजनांच्या मदतीने शेतीचा मळा फुलवला जात आहे.
कुंडलिक ताम्हणकर कृषी सहाय्यक यांचे शेतीसाठी बंदीजनांना मार्गदर्शन होत आहे.
-विवेक झेंडे, कारागृह अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com