‘एका प्रभागासाठी एक अधिकारी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एका प्रभागासाठी एक अधिकारी’
‘एका प्रभागासाठी एक अधिकारी’

‘एका प्रभागासाठी एक अधिकारी’

sakal_logo
By

‘एका प्रभागासाठी एक अधिकारी’
गडहिंग्लजमध्ये नव्या वर्षात नवीन संकल्पनेची गरज; नागरी सुविधांना येईल गती
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : नगरपालिकेवर प्रशासक राजच्या कारभाराचे वर्ष उलटले आहे. वर्षभर हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याने समस्या कोणाकडे मांडायच्या, हाच एक प्रश्‍न अनेक वेळा नागरिकांना सतावत राहिला. आता नवीन वर्षात निवडणुका होईपर्यंत तरी प्रशासनाने एक प्रभाग-एक अधिकारी ही संकल्पना राबवून गतीने नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज शहरवासीयांतून पुढे येत आहे.
२९ डिसेंबर २०२१ रोजी तत्कालीन सभागृहाची मुदत संपली. त्यानंतर प्रशासक राज आले. सुरुवातीला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे हे प्रशासक होते. काही महिन्यांपासून मुख्याधिकारी स्वरूप खारगे प्रशासक आहेत. प्रशासकांकडे समस्या घेऊन जाणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नागरिक असतात. पाणी, वीज, आरोग्य, रस्ते, गटारी, शिक्षण, विविध दाखले, परवाने मिळवणे आदी सुविधा पुरवण्यात मागे-पुढे झाल्यानंतर हक्काच्या नगरसेवकांकडे नागरिक जायचे. वर्षभरापासून नगरसेवकच नसल्याने प्रशासकांकडे कारभार असला तरी प्रत्येक प्रश्‍नात लक्ष घालणे प्रशासकांना शक्य होतेच, असे नाही.
कचरा उठाव, पाणीपुरवठा आदी दैनंदिन कामकाज प्रशासनाकडून होतच असते. एखादी सार्वजनिक समस्या नागरिकांतून प्रशासनापर्यंत पोहचल्यानंतर ती अपेक्षित गतीने सोडवण्यासाठी प्रशासकांनी एक अधिकारी-एक प्रभागाची संकल्पना राबवण्याची गरज आहे. निवडणुका कधी होणार, हे सध्यातरी कोणीच सांगू शकत नाही. नागरिकांतून येणाऱ्‍या समस्येच्या निराकरणासाठी प्रशासकांवरील ताणही यामुळे कमी होणार आहे. या संकल्पनेतून शहरात सुशासन अवतरण्यास मदत मिळेल. प्रायोगिक तत्त्वावर का असेना काही महिने हा प्रयोग केल्यास नागरिकांतून प्रशासनाविषयी आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत होईल.
---------------
* कशी असावी कार्यवाही
- पालक अधिकारी नगरसेवक तर प्रशासक नगराध्यक्ष म्हणून भूमिका बजावतील
- शहरातील प्रत्येक प्रभागासाठी एका अधिकाऱ्‍यांची हवी नियुक्ती
- प्रभागात संबंधित पालक अधिकाऱ्‍यांचा संपर्क क्रमांक प्रसारित करणे
- कोणत्याही विभागाच्या कामासाठी पालक अधिकाऱ्‍यांना नागरिक संपर्क करतील
- नियम व व्यवहाराची सांगड घालून समस्या सोडवण्याचा प्रयत्न व्हावा
- नागरिकांच्या समस्या सोडविण्यात गती येईल