कोवाड-आग्निचे तांडव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-आग्निचे तांडव
कोवाड-आग्निचे तांडव

कोवाड-आग्निचे तांडव

sakal_logo
By

72520
कुदनूर ः येथील शशिकांत सुतार यांच्या राईस मिल, सॉ मिल, मिनी ऑईल मिल व फॅब्रिकेटरच्या दुकानाला आग लागली.
-----------------
72521
कुदनूर ः आगीत जळालेली मोटारसायकल.

राईस मिलसह सॉ मिल खाक

कुदनूरमध्ये आग्नितांडव ः एक कोटीच्यावर नुकसान

सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. १ ः कुदनूर (ता. चंदगड) येथे शनिवारी मध्यरात्री शशिकांत शिवराम सुतार व त्यांचे बंधू यांच्या मालकीची राईस मिल, सॉ मिल, मिनी ऑईल मिल व फॅब्रिकेटरचे दुकान आगीत जळून खाक झाले. सुतार कुटुंबीयांनी गेल्या चाळीस वर्षांपासून कष्टातून उभा केलेला व्यवसाय एका रात्रीत आगीत भस्मसात झाला. आगीत एक कोटीच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. चंदगड पोलिस व महसूल विभागाने घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
शनिवारची रात्र सुतार कुटुंबीयांसाठी काळरात्र ठरली. डोळ्यादेखत आपला व्यवसाय जळून खाक होत असल्याचे पाहून सुतार कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; पण अग्नितांडव थांबता थांबेना. दुकानांच्या चारही बाजूंनी आगीने पेट घेतला होता. त्यामुळे तिन्ही व्यवसायांचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेचा सुतार कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
शशिकांत सुतार, दिलीप सुतार व गजानन सुतार यांनी कालकुंद्री रोडवर स्वतःच्या जागेत सिद्धेश्वर सॉ मिलच्या रुपाने व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतर सुतार ऑईल मिल, राईस मिल व शिवराम फॅब्रिकेटरचा व्यवसाय सुरू केला. एकत्र कुटुंब असल्याने त्यांनी आपल्या व्यवसायात जम बसविला होता. शनिवारी रात्री साडेतीनच्या सुमारास त्यांच्या ऑईल मिलला आग लागली. आगीचे लोट दूरवर पसरत गेले. त्याला लागून असलेल्या सॉ मिल व फॅब्रिकेटरच्या दुकानानेही पेट घेतला. दरम्यान, शेजारच्या लोकांना याची कल्पना आल्याने त्यांनी सुतार बंधूंना झोपेतून उठविले. आरडाओरडा केल्याने गावातील लोक आग विझवण्यासाठी धावत आले. मात्र अर्ध्या तासात आगीने सर्वच दुकानांना वेढा टाकला होता. ऑईल मिलमध्ये पाच बकरी होती. त्यातील दोन मृत झाली, तर तीन बकरी बाहेर काढण्यात आली. आग आटोक्यात आणण्यासाठी गडहिंग्लज नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र, तोवर आगीत तीन मोटारसायकली, मोठ्या चार मशिन, ऑईल मिल, मिनी राईस मिल, वेल्डिंग मशिन, टायर, ग्रॅंडर, तिन्ही व्यवसायांचे शेड, १० विद्युत मोटारी जळून खाक झाल्या होत्या.