
कोल्हापूर शहर परिसरात आढळला ‘गोंदन’ वृक्ष
73037
कोल्हापूर : शहर परिसरात आढलेला ‘गोंदन’ वृक्ष
शहर परिसरात आढळला ‘गोंदन’ वृक्ष
सर्वेक्षण करताना माहिती पुढे; भोकर कुळातील प्रजात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : शहर आणि परिसरातील वृक्षांचे सर्वेक्षण करताना वनस्पती अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे यांना मंगळवार पेठ येथील शाहू दयानंद हायस्कुल नजीक गोंदनीचा वृक्ष आढळला. नैसर्गिकरित्या गोंदनीचे वृक्ष भारत, श्रीलंका, चीन, तैवान, इंडोनेशिया, म्यानमार, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान या देशात आढळतो. महाराष्ट्रामध्ये याची झाडे अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, अकोला, नाशिक, उस्मानाबाद, पुणे व ठाणे या ठिकाणी नोंदविलेला आढळतो. गोंदनी हा बोरॅजिनेसी अर्थात भोकर कुळातील वृक्ष आहे. हा वृक्ष भोकर, बुरगुंड, दहिवन यांचा भाऊबंद असून कोल्हापूर शहर परिसरात तो एकमेव वृक्ष आहे.
या वृक्षास गुंदी, लैरी असेही मराठी व इंग्रजीमध्ये ग्रे लिव्हड सॉसरबेरी, नॅरो लिव्हड सेपिस्टन अशी नावे आहेत. गोंदनीला शास्त्रीय भाषेत कॉर्डिया सायनेन्सिस असे म्हणतात. याचे पूर्वीचे प्रचलित शास्त्रीय नाव कॉर्डिया गराफ असे आहे. ‘कॉर्डिया’ हे जातीवाचक नाव जर्मन वनस्पती अभ्यासक कॉर्डस यांच्या नावावरून देण्यात आले आहे तर ‘सायनेन्सिस’ या प्रजाती नावाचा अर्थ मूळचा चीन येथील असा होतो. याच्या फळांमध्ये डिंकासारखा चिकट पदार्थ (गोंद) असतो जो पूर्वी डिंकाच्या कॅप्सूलप्रमाणे फळाला छिद्र पाडून वापरला जात असे म्हणून गोंदन असे मराठी नाव.
हा छोटेखानी वृक्ष ५ ते ८ मीटर उंच वाढतो. याची पाने साधी, लांबट असून त्यांची रचना समोरासमोर असते. फुलोरे पानांच्या बेचक्यातून किंवा फांद्यांच्या टोकाकडून येतात. याची फुले लहान, पिवळसर पांढरट असतात. फुलांना मंद वास असतो. याची फळे लंबगोलाकार, चकचकीत, फिकट नारंगी, गरयुक्त असून त्यात एकच बी पाहावयास मिळते.
-------------
कोट
कोल्हापूर शहरातील औषधी गुणांनीयुक्त एकमेव अशा गोंदन वृक्षाला ‘हेरीटेज ट्री अर्थात वारसा वृक्षाचा’ दर्जा देऊन त्याचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. याची फळे अनेक स्थानिक पक्षी आणि कीटकांना आकर्षित करतात
- डॉ. मकरंद ऐतवडे, वनस्पती अभ्यासक