
मंजूर निधी खर्चासाठी शनिवारी बैठक
जिल्हा परिषद ... लोगो
...
मंजूर निधी खर्चासाठी शनिवारी बैठक
प्रशासकीय, तांत्रिक मान्यतेच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना निधी मंजूर झाला आहे, मात्र हा निधी अखर्चित राहू नयेत, त्यातूनही खर्च होणार नसेल तर तो निधी परत करण्याबाबत आज प्राथमिक चर्चा करण्यात आली. शनिवारी (ता.७) पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत विविधकामांना मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांनी गती घेतली आहे. दररोज याबाबत आढावा घेतला जात आहे. नियोजन समितीकडे नावीन्यपूर्ण योजनेतून सुमारे २५ कोटींचे प्रस्ताव आले आहेत, मात्र निधी केवळ ८ कोटीच उपलब्ध आहे. त्यामुळे जो निधी खर्च होणार नाही, तो या योजनेकडे वळवला जाणार आहे. सध्या अंबाबाई मंदिर परिसर विकास, रंकाळा, तालमींचा विकास, हेरिटेज रोड आदींसाठी निधीची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे अनेक प्रस्तावित योजनांना कात्री लागणार आहे. आपल्या विभागाच्या योजनांना मात्र कात्री लागू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांची धावपळ सुरू आहे. मिळालेला सर्व निधी खर्च करण्याची तयारी सर्व विभागांनी व खासकरून बांधकाम विभागाने ठेवली आहे. यासाठी मागील तीन-चार महिने नियोजन सुरू आहे.
शनिवारी होणाऱ्या बैठकीत विभागनिहाय योजनांचा आढावा होणार आहे. तत्पूर्वी केलेल्या तयारीची माहिती आज घेण्यात आली. प्रस्तावित योजनांची सद्यस्थिती, अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता तपासण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांनी खातेप्रमुखांना सूचना केल्या. तसेच पुढील दोन दिवसांत अपूर्ण प्रस्ताव पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.