कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

लोगो ः शोधवृत्त
सुनील पाटील

72535
-
७२९६८ - मुंडा दरवाजा

विशाळगडाला दुरवस्थेचा वेढा
विदारकदृश्‍य लोकप्रतिनिधींना दिसणार कधी? ढासळणाऱ्या बुरुज, दगडांचा दुर्गप्रेमींच्या जीवाला धोका

विशाळगडावरील ढासळणाऱ्या बुरुजांचे नव्याने झालेले दर्जाहीन बांधकाम... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पन्हाळा-पावनखिंड मोहिमेत प्राणांची आहुती दिलेले बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे जाण्यासाठी करावी लागणारी कसरत (येथे रस्ताच गायब झाला आहे), छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई अहिल्याबाई भोसले यांची दुर्लक्षित समाधी, गडावरील असलेले पण शोधावे लागणारे नरसिंह मंदिर, मारुती टेक मंदिर, अमृतेश्‍वर महादेव मंदिर, भूपाल तलाव. ग्रामदैवत वाघजाईदेवी मंदिरासह सर्व मंदिरची झालेली पडझड...हे विशाळगडाचे विदारक दृश्‍य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना विशाळगडावरील हे विदारक चित्र दिसणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विशाळगडावरील ढासळलेल्या बुरुजांची डागडुजी व्हावी, त्याला ऐतिहासिक वास्तूचा बाज पुन्हा यावा यासाठी शासनाच्या पर्यटन विकास निधीतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानुसार दोन बुरुजांसह इतर काही कामेही केली. मात्र, बुरुजांचे दगड काही वर्षांतच निखळू लागले आहेत. नवीन बांधकाम कधीही ढासळून मोठी दुर्घटना होऊ शकते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या एकूणच कामावर आणि त्यावर खर्च झालेल्या कोट्यवधींच्या निधीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.
गडकोटांचे संवर्धन आणि संरक्षण झाले पाहिजे. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे. या पार्श्वभूमीवर स्वराज्यातील ज्वलंत आणि शिवकालीन धगधगता इतिहास लोकांना प्रेरणा देत राहिला पाहिजे. यासाठी, गडकोट संवर्धनासाठी म्हणून विशाळगड आणि रांगणा किल्ल्यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी विशाळगड येथे ५ कोटी रुपयांची कामे झाली. २०१८-१९ मध्ये विशाळगडावरील पूर्व बाजूच्या चार दगडी बुरुजांचे बांधकाम केले. यामुळे इतिहासाला उजाळा मिळाला; मात्र गेल्या वर्षात याच बुरुजांची पडझड सुरू झाली. पूर्वी असलेल्या बुरूजांच्या पायावरचनव्याने उभारणी केली आहे. नवीन बांधलेले बुरुज कधीही ढासळू शकतात. विशेषत: पावसाळ्यात मोठा धोका आहे. घडणावळीचे दगड वापरून हे बांधकाम केले आहे. गडावर बांधकाम साहित्य नेण्यासाठी निश्‍चित अडचणी आल्या आहेत. जे काम झाले त्यासाठी साडेचार ते पाच कोटी खर्ची पडल्याचा अंदाज दुर्गप्रेमीकडून व्यक्त होत आहे. बुरुजावरील चुना, वाळू, दगड निखळले आहेत यावरून कामाच्या दर्जाविषयी कल्पना येते. पुरातत्त्‍व विभागाने या कामाकडे गांभीर्याने पाहिले आहे की नाही हा प्रश्‍न आहे. मागच्या पावसाळ्यात याच नवीन बांधकामाचा काही भाग कोसळला. त्यामुळे आता खबरदारी घ्यावी लागणार आहे; तसेच या कामाचा दर्जा तपासण्याची मागणीही होत आहे.
....
पायऱ्या निखळल्या, कमानीचे कामही दर्जाहीन
गडावरील बुरुजांसह नव्या रस्त्यावरील पायऱ्या आणि छोट्या कमानींची डागडुजी केली आहे. ही दुरुस्ती करताना काळजी घेतली नसल्याचे दिसते. गडावर जाण्याच्या मार्गावर दोन नादुरुस्त मोठ्या चौकटी आहेत. त्यावर ८०० ते ९०० वर्षांपूर्वीचे बांधकाम आणि नवीन बांधकामातील फरक सहज लक्षात येतो. नवीन बांधकामामध्ये पूर्वीच्या बांधकामाला समरस होईल, असे बांधकाम होणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात जे नवीन दगडी बांधकाम केले. त्यामध्ये सिमेंटचा वापर केला आहे. दगडांवरील नक्षीकाम आणि आधीच्या दगडांवरील नक्षीकाम यामधील फरक स्पष्ट दिसतो. नव्याने बांधलेल्या चौथऱ्यांचे दगड निखळलेत. त्याकडे ठेकेदाराने पुन्हा लक्ष दिलेले नाही. पायऱ्यांचे दगड आणि सिमेंट वाळू उघडे पडले आहे. पायऱ्या पार करून जाण्यासाठी दुर्गप्रेमींना कसरत करावी लागते. जे बांधकाम झाले ते दर्जाहीन आहे. त्यामुळे गड संवर्धनासाठी नेमके काम झाले म्हणजे काय केले? असा प्रश्‍न दुर्गप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. या बांधकामाविषयी संबंधित ठेकेदाराला विचारून त्याचे ऑडिट केलेले नाही. अशा दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदाराला यंत्रणाच पाठीशी घालते आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

७२९६६
बाजीप्रभू देशपांडे यांचा समाधी मार्ग शोधा
सिद्दी जोहरने पन्हाळ्याला घातलेल्‍या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज यांनी पावनखिंड पार केली. त्यावेळी, दख्खनच्या सैन्यापासून आपल्या राजाला वाचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह शेकडो सैनिकांनी प्राणांची आहुती दिली. यामध्ये प्राणांची आहुती देणारे बाजीप्रभू देशपांडे; तसेच त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांची समाधी विशाळगडावर बांधली; मात्र या समाधी मार्गावरच अतिक्रमण केले आहे. दुर्गप्रेमींना समाधीच्‍या दर्शनासाठी जाणाऱ्या पायवाटेवर प्रचंड कचरा व दुर्गंधी आहे. पावनखिंडची लढाई, बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम वाचून दुर्गप्रेमी विशाळगडावर येतात. त्यांना समाधीपर्यंत पोचताना कसरत करावी लागते. याकडे शासनानेही दुर्लक्ष केले आहे. ऐतिहासिक घटनांवर आधारित मराठी-हिंदी अनेक चित्रपट निर्मितीतून शेकडो कोटी रुपये कमावतात; पण या थोर पुरुषांच्या समाधी सुस्थितीत करण्याकडे वा समाधी मार्ग मोकळा करायला शासनाचे लक्षच नाही. गडावरील काही धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण झाले आहे. इतर धार्मिक स्थळे मात्र ऐतिहासिक चित्रपटात किंवा व्याख्यानात छत्रपती शिवरायांचे शौर्य सांगण्यापुरतेच मर्यादित राहिली आहेत. शासनासह जिल्हा प्रशासन आणि पुरातत्त्‍वकडून याची दखल केव्हा घेण्यात येणार आहे? असाही प्रश्न दुर्गप्रेमींकडून विचारला जात आहे.

७२९६७
अहिल्याबाई भोसले यांची दुर्लक्षित समाधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांचा जन्म राजगडावर झाला, तर मृत्यू सिंहगडावर झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा अहिल्याबाई भोसले विशाळगड येथे सती गेल्या. आजही तेथे त्यांचे स्मारक आहे; मात्र, स्मारकापर्यत जाण्यासाठी मार्ग नसल्याने ही समाधीही दुर्लक्षित झाली आहे. विशाळगडावर शासनाच्या माध्यमातून जी कामे केली जात आहेत त्यामध्ये या समाधीच्या दुरुस्तीचा, परिसराच्या विकासाचे काम कधी हाती घेण्यात येणार? असा प्रश्‍न शिवप्रेमी विचारत आहेत.

पेव्हिंग ब्लॉकचा वापर
गडावर काही ठिकाणी रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉकचा वापर करण्यात आलेला आहे. ते बसवताना पुरातत्त्‍वची परवानगी घेण्यात आली होती का? घेतली होती तर पेव्हिंग ब्लॉक वापरास परवानगी कोणत्या नियमानुसार दिली? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

या स्थळांकडे दुर्लक्ष
- मुंडा दरवाजा : गडाचे प्रवेशद्वारे म्हणून ओळख आहे. एक बुरुज आणि दरवाजा अजूनही पहायला मिळतो.
- भगवतेश्र्वर मंदिर : गडाचे वैभव असणाऱ्या भगवतेश्र्वर मंदिराचे अस्तित्व धोक्यात येत आहे.
- विहीर : विहिरीत महादेवाचे छोटेसे मंदिर आहे.
- मंदिरे : खोकलाबाई मंदिर, वाघजाई मंदिर, अमृतेश्र्वर मंदिर, गणेश मंदिर, नरसिंह मंदिर, मारुती मंदिर
- राजवाडा : गडावर पूर्वीचे प्रधान होते त्यांच्यासाठी असणारा हा वाडा
- टकमक टोक : किल्ल्यावर विशाल असे टकमक टोक आहे.

कोट
विशाळगडावरील बुरुजांचे बांधकाम शासकीय नियमानुसारच झाले आहे. पाऊस जास्त असल्यामुळे काही ठिकाणी बुरुजांचे दगड, वाळू निखळत आहे. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे.
-विलास वाहने, सहायक संचालक, पुरातत्त्‍व विभाग, पुणे
.....
विशाळगड संवर्धनासाठीच्या निधीचा योग्य कामांसाठी वापर झालेला नाही. पुरातत्त्‍वकडून गडाचा ऐतिहासिक बाज जपलेला दिसत नाही. बुरुजांचे बांधकाम करताना त्यातून पाण्याचा नळ घातला आहे. बुरुजांचे पूर्वीचे बांधकम अजूनही मजबूत आहे, पण नवीन बांधकाम ढासळत आहे. विशागडावरील बांधकाम हे पुरातत्त्‍वच्या नियमानुसार झालेले नाही. त्यामुळे त्याची चौकशी झालीच पाहिजे. तेथील समाधीं, मंदिरांचे जतन आणि संवर्धन व्हायला हवे.
-हर्षल सुर्वे, शिवदुर्ग संवर्धन आंदोलन प्रमुख