‘गोडसाखर’च्या निवृत्त कामगारांचा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोडसाखर’च्या निवृत्त कामगारांचा मोर्चा
‘गोडसाखर’च्या निवृत्त कामगारांचा मोर्चा

‘गोडसाखर’च्या निवृत्त कामगारांचा मोर्चा

sakal_logo
By

gad42.jpg
73152
गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांनी प्रांत कार्यालयावर काढलेला मोर्चा. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------------------
‘गोडसाखर’च्या निवृत्त कामगारांचा मोर्चा
थकीत देणी देण्याची मागणी; आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवृत्त कामगारांनी आज पुन्हा एकदा मोर्चा काढत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. थकीत देणी मिळावित, या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर हे आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार निवृत्त कामगारांनी केला.
थकीत देणी मिळावीत, या मागणीसाठी गोडसाखरच्या निवृत्त कामगारांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रांत कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास निवृत्त कामगार जमले. तेथून मोर्चाला सुरवात झाली. लक्ष्मी रोड, बाजारपेठ, वीरशैव चौक, संकेश्वर रोड, मुख्य मार्गावरून फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. आंदोलकांच्या विविध घोषणांनी मोर्चा मार्गावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
प्रांत कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. गोडसाखर सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. थकीत देणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून, त्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार केला. प्रांताधिकाऱ्यांच्या नावे असलेले निवेदन नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांनी स्वीकारले. निवृत्त कामगारांच्या देण्यांबाबत कारखान्याचे अध्यक्ष, साखर सहसंचालक, कामगार आयुक्तांसोबत बैठक बोलवावी, औद्योगिक न्यायालयाच्या निकालानुसार कारखाना व ब्रिक्स कंपनीने ८ टक्के व्याजाने कामगारांची रक्कम देण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम ठरवावा यासह विविध मागण्या निवेदनातून केल्या आहेत. रामा पालकर, बाळासाहेब लोंढे, महादेव मांगले, लक्ष्मण देवार्डे, सुरेश पाटील, दिनकर खोराटे, सुभाष पाटील, अरुण लोंढे यांच्यासह कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.
--------------
पोटासाठी हा तमाशा...
शिवाजी खोत म्हणाले, ‘कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी आमच्या आंदोलनाला तमाशा म्हणून हिणवले होते. पण, आमचा हा तमाशा पोटासाठी आहे. तमाशा हा शब्द वापरल्याची फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल. येत्या काळात त्यांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही.’

* आंदोलनाची पुढील दिशा
- गडहिंग्लज येथे १० जानेवारीला रास्ता रोको आंदोलन
- कागल येथे शिवाजी पुतळ्यापासून अर्धनग्न व भीक मागो आंदोलन
- कोल्हापूर येथील बिंदू चौकात अर्धनग्न व भीक मागो आंदोलन