स्मशानभूमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमी
स्मशानभूमी

स्मशानभूमी

sakal_logo
By

73469

स्मशानभूमीच्या कामाला मुहूर्त केव्हा?
शेडच्या सळ्या तुटू लागल्या; नागरिकांच्या जिवाला धोका

कोल्हापूर, ता. ५ ः पत्रे खराब झाले आहेत. ते ज्या फॅब्रिकेशनवर बसवले आहेत त्याच्या सळ्या तुटून पडत आहेत. विटांच्या कॉलमच्या भेगाही वाढत आहेत. या साऱ्यांचे काम तातडीने सुरू करण्याबाबतचे आदेश दिले. त्यालाही चार महिने झाले असून, कामाला मुहूर्त मिळालेला नाही. विस्तारीकरणाच्या कामासाठी तर अजून कशाचाच पत्ता नाही अशी स्थिती आहे.

यंदाच्या पावसात स्मशानभूमीत पाणी गळत असल्याचे दिसल्यानंतर जुलैपासून खराब झालेल्या शेडच्या दुरुस्तीची चर्चा सुरू आहे. त्यावेळी काही दानशूर पत्रे बदलून देण्यासाठी पुढे आले. आयती मिळणारी सुविधा नाकारून आपणच काम करण्याचे ठरवले गेले. त्यातूनही काही घडत नसल्याने आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी सप्टेंबरमध्ये पाहणी करून बैठक घेतली. महापालिकेनेही स्वनिधीतून दुरुस्ती करावी तसेच एक कोटीची तातडीने तरतूद करावी अशी सूचना केली होती. तसेच आमदार फंडातून एक कोटीचा निधी देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर चार महिने होत आले तरी प्रशासनाकडून अजूनही दुरुस्तीची प्रक्रिया कागदपत्रावरच आहे.
या कालावधीत दुरवस्था आणखी वाढत चालली आहे. फाटलेले पत्रे तसेच असून त्याचे फॅब्रिकेशन धोकादायक बनत चालले आहे. अशा जुन्या असलेल्या १२ बेडच्या शेडमध्ये अजूनही अंत्यसंस्कार केले जात असून, विधीसाठी त्याखाली नागरिक उभे असतात. फॅब्रिकेशनच्या लोखंडी सळ्या तुटत आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक खराब झालेली सळी तुटून खाली पडली. त्यावेळी तिथे कुणी नसल्याने अनर्थ टळला. पण, हे प्रकार घडत आहेत. या शेडच्या विटांच्या बांधकामाच्या कॉलममध्ये भेगा वाढत आहेत. या अवस्थेमुळेच तातडीने काम करण्याच्या सूचना आमदार सतेज पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासन आता निविदा प्रक्रियेच्या टप्प्यावर आले आहे. नवीन शेडसाठी महापालिकेचा ५३ लाखांचा निधी वापरण्यात येत आहे. विस्तारीकरण तसेच विद्युतीकरण, स्वच्छतागृह, पार्किंग या कामांसाठी आमदार सतेज पाटील व आमदार जयश्री जाधव यांचा प्रत्येकी ५० लाखांचा असा एक कोटीचा निधी वापरण्याचे ठरले आहे. त्यासाठीही प्रशासनाकडून गतिमान हालचाली दिसून येत नाहीत.

चौकट
मदत करणारे भरपूर, पण...
तोडलेल्या झाडांची कापणी करण्यासाठी साडेतीन लाखांचे मशीन महापालिकेला दानशूर व्यक्तीने दिले आहे. ते बसवण्यासाठी दानशूर व्यक्ती पुढे येऊन कॉंक्रिटीकरण करून देण्याबरोबरच शेडही उभे केले जात आहे. याप्रकारे अनेकजण स्मशानभूमीसाठी मदत करणारे पुढे येतात. पण, त्यांच्याकडून काम करून घेण्यात महापालिकाच उत्सुक नसल्याचे जाणवते.

चौकट
विद्युत दाहिनीसाठी हवेत प्रयत्न
शहरातील हवेत धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी पेटवला जाणारा कचरा तसेच इमारतींच्या बांधकामाचा कचरा कारणीभूत ठरत आहेत. तसेच स्मशानभूमीत पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या दहनातूनही धुलिकणांचे प्रमाण वाढते. त्यासाठी विद्युत दाहिनीचा वापर केला जाणे क्रमप्राप्त ठरणार आहे. गॅस दाहिनी मोफत बसवण्यात आली आहे. विद्युत दाहिनीसाठीही आवाहन केले तर दानशूर व्यक्ती पुढे येतील व कामाला तातडीने चालना मिळेल.

कोट
१२ बेडचे संपूर्ण शेडच नवीन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्वनिधीतून ५३ लाखांची निविदा प्रक्रिया राबवली आहे. या आठवड्यात ती पूर्ण होईल.
-नारायण भोसले, उपशहर अभियंता