
सोमवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन
जि.प.ची सोमवारी
सर्वसाधारण सभा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : जिल्हा नियोजन मंडळातून या आठवड्यात निधीचे वाटप होणार आहे. त्यामुळे विविध विभागांच्या नवीन योजनांना मंजुरी देण्यासाठी सोमवारी (ता. ९) सर्वासधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे.
गेली वर्षभर विकासकामे ठप्प झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या विकासकामांना जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा आधार आहे. नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला किमान २०० कोटी रुपयांचा निधी मिळतो. मात्र, राज्यातील सत्ता बदलामुळे, त्यानंतर पालकमंत्री निवडीला झालेल्या विलंबाने व त्याहीपुढे पालकमंत्री निवडीनंतर नियोजनमध्ये काहीच निर्णय न झाल्याने जिल्ह्यातील सर्वच विकासकामे ठप्प होती. आता मार्च महिना जवळ आल्याने निधी खर्च केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. जर हा निधी खर्च झाला नाहीतर तो शासनाला परत पाठवला जाणार आहे. ही नामुष्की येऊ नये, यासाठी आता गडबड सुरू आहे.
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक शनिवारी (ता. ७) होत आहे. यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी सादर केलेल्या योजनांची व मागितलेल्या निधीबाबत चर्चा होणार आहे. यातील जी कामे अत्यंत आवश्यक आहेत, नावीण्यपूर्ण आहेत. त्यांना तत्काळ निधी दिला जाणार आहे. मात्र, केवळ मंजुरी देऊन कामे मार्गी लागणार नाहीत. तर त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यताही आवश्यक आहे. यासाठीच सोमवारी (ता. ९) सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.