मोती बिंदू वाढते प्रमाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोती बिंदू वाढते प्रमाण
मोती बिंदू वाढते प्रमाण

मोती बिंदू वाढते प्रमाण

sakal_logo
By

साठीनंतरचा मोती बिंदू होतोय चाळीशीत

कोल्हापूर , ता. ६ ः रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघणे, संगणकावर सलग काम, टीव्ही जास्त बघणे, उन्हाची तीव्र किरणे डोळ्यांवर सतत येणे, असंतुलित आहार आदी कराणांतून डोळ्यांच्या विकारात वाढ होत आहे. पूर्वी साठीनंतर होणारा मोती बिंदू विकार सध्या चाळशीत होत आहे. त्यावर सीपीआरमधील नेत्रोपचार विभागात उपचार व मोफत शस्त्रक्रियेची सुविधा आहे. मोतिबिंदूपासून होणारा त्रास वाचवण्यासाठी डोळ्यांची खबरदारी घेणे महत्त्‍वाचे आहे.
मोती बिंदू हा वयानुसार सगळ्यांनाच होणारा आजार आहे. पूर्वी ५० नंतर होणारे विकार सध्या ४० ते ५० वयोगटांत होत आहेत. यात जास्त काळ उन्हात व धुळीत काम करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना लवकर मोती बिंदू तयार होतो. मधुमेह असणाऱ्यांनाही मोती बिंदू लवकर होऊ शकतो. यात डोळ्यामागील रेटेनामधील रक्तवाहिन्यात रक्तांच्या गुठळ्या तयार होऊन रक्तस्त्राव होतो. तेव्हा डोळ्यांची समस्या गंभीर बनते.
डोळ्यातील टेरीजम (मांस) वाढण्याचे प्रमाणही वाढते आहे. उन्ह, धुळीत काम करणाऱ्या व्यक्तींत हे प्रमाण जास्त आढळते. मोती बिंदू व टेरेजम हे विकार वेगळे आहेत. त्यामुळे दोन्हींच्या शस्त्रक्रिया स्वतंत्रपणे कराव्या लागतात.
मोती बिंदू शस्त्रक्रियेसाठी सध्‍या दोन पर्याय लक्षणीय प्रमाणात वापरले जातात.

चौकट
स्वाल इन्सिजन कॅटरॅक सर्जरी
डोळ्यांवर याद्वारे सीपीआरमध्ये सध्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यात बिना टाक्याच्या मोती बिंदू शस्त्रक्रिया होतात. त्यासाठी पाच मिलिमीटरचा छेद घेतला जातो. त्यात कृत्रिम भिंगारोपन शस्त्रक्रियेद्वारे केले जाते. खासगी रुग्णालयात किमान दहा हजार रुपये खर्च येतो. सीपीआर रुग्णालयाच्या नेत्र विभागात मात्र सध्या याच प्रकारातील शस्त्रक्रिया मोफत होते.

चौकट
फेको शस्त्रक्रिया
मोती बिंदू दूर करण्याचा फेको हा दुसरा शस्त्रक्रियेचा उपचार आहे. यात फ्लेग्झिबल लेन्स डोळ्यात बसवली जाते. त्यासाठी जखमी छोट्या आकारात २. ८ किंवा २-६ मिलिमीटरचा छेद घेतला जातो. खासगी रुग्णालयात बारा ते पंधरा हजारांपर्यंत खर्च येऊ शकतो.

चौकट
ही घ्या काळजी...
-रात्री जास्त काळ मोबाईल बघणे टाळावे (मोबाईल रात्री जास्त काळ बघितल्यास डोळ्यांच्या पडद्याना त्रास होऊ शकतो.)
-ग्रहण थेट बघू नये. (ग्रहणातील किरणामुळे डोळ्यांचा पडदा कमकवुत होतो किंवा इजा होऊ शकते)
-मधुमेह व रक्तदाब वेळीत तपासणी करून उपचार घ्यावेत.

कोट
मोती बिंदू विकार टाळण्यासाठी खूप उन्हात जाणे टाळावे. मोबाईल व संगणकाची किरणे जास्त काळ डोळ्यावर घेणे टाळावे. मधुमेहींनी सहा महिन्यांतून एकदा तरी डोळ्यांचा पडदा तपासावा. आहारात हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.
डॉ. सुजाता वैराट, नेत्रोपचारतज्ज्ञ, सीपीआर