
आजरा ः आजरा कारखाना पत्रकार परिषद
आजरा कारखान्याला ऊस पाठवावा
अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यांचे आवाहन; वेळवर बिले अदा
आजरा, ता. ६ : गडहिंग्लज उपविभागात आजरा हा एकमेव साखर कारखाना सहकारी तत्वावर सुरु आहे. तो टिकण्यासाठी सभासदांसह सर्वांनी योगदान दिले असून पुढेही द्यावे. शेतकऱ्यांनी आपला ऊस बाहेर न पाठवता आजरा कारखान्याला पाठवावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यांनी पत्रकार परिषदेत केले. शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर बिल अदा करत असल्याचेही सांगीतले.
ते म्हणाले, ‘दोन वर्षापूर्वी आर्थिक अडचणीमुळे आजरा कारखाना बंद होता. हा कारखाना सहकारात पुर्ववत सुरु करण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. सभासद, शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना पुन्हा सहकारात सुरु झाला. हा कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी संचालक, प्रशासनाकडून धडपड सुरु आहे. सभासद व शेतकऱ्यांनीही यासाठी सहकार्य करावे. ऊस बिले वेळेत देत आहे. वजन काटा चोख आहे. दिवसाला ३५०० मेट्रिक टन गाळप सुरू आहे. यंदा चार लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे. यामुळे कारखान्याला आर्थिक अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी संधी आहे.’
तालुक्यात ५ हजार २०० हेक्टर ऊस पिकाखाली क्षेत्र आहे. त्यामुळे ३ लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. कारखान्याने २ लाख टनाचे गाळप केले आहे. यामध्ये ८० हजार टन कार्यक्षेत्रातून ऊस गाळप केला आहे. अजून १ लाख २० हजार टन ऊस कार्यक्षेत्रात गाळपासाठी उपलब्ध आहे. क्रमपाळीने ऊस उचलला जात आहे. हती व गवे बाधीत क्षेत्रातील ऊस उचलण्यावर प्राधान्य दिले आहे. वेळाने गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला उशीराचे अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. टोळ्यांनी खुशालीची मागणी केल्यास कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा. कार्यक्षेत्रातील व करार केलेल्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपाची जबाबदारी कारखाना प्रशासनाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस घालवण्यासाठी कोणतीही घाई करू नये. ऊस आजरा कारखान्याला पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.