
श्रीमंत शाहू महाराज टॉक शो
73718
छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करा
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती; अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुक्त संवाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्यांच्याविषयी वाचन करा. दुर्गभेटीतून त्यांचे शौर्य जाणा. यातून त्यांच्या कार्याचा आपसुकच अभ्यास होईल, जो जगण्यासाठी स्फुर्तीदायक ठरेल, असे मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी श्रीमंत शाहू महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांसोबत ‘मुक्त संवादा’चे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना श्रीमंत शाहू महाराजांनी दिलखुलास उत्तरे देत संवाद खुलवला.
शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी शाहू महाराजांशी संवाद साधण्यासाठी शाहू विद्यालयाच्या प्रांगणात जमले होते. प्रत्येक शाळेतील एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्याची संधी दिली.
ते म्हणाले, ‘‘कोल्हापूरात कोणत्याही प्रांतातील, जाती - धर्माची व्यक्ती येऊन उद्योग उभारू शकते. काम करू शकते. येथील मानवतावादी दृष्टीकोनामुळे सर्व जाती धर्मातील लोक सलोख्याने राहत आहेत. कोल्हापुरात एखादा विचार रूजला की तो महाराष्ट्रभर जातो. महाराष्ट्रातून तो देशभर जातो, हा इतिहास आहे. प्रत्येक शाळेत कुस्तीचे धडे द्यावेत.त्यात आधुनिकताही अंगिकारावी.’’ शाहू जन्मस्थळाच्या विकासकामांचे काम कधी पूर्ण होईल या प्रश्नावर त्यांनी अमरजा निंबाळकर यांच्याकडे माईक सोपवला. त्यांनी फक्त म्युझियमचे काम अपूर्ण असून, त्याला शाहू महाराजांचे पाठबळ असेल तर पुढील वर्षात पूर्ण होईल, असे सांगितले. शाहू महाराजांनी राजकीय प्रवासही या संवादात उलगडला.
संग्रामसिंह राजेभोसले, महाराणी याज्ञसेनीराजे, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती व यशस्विनीराजे छत्रपती आदी उपस्थित होते. अभिषेक मोहिते यांनी स्वागत केले.
चौकट
मी जनतेचा सेवकच
मुक्त संवादाला आलेल्या पाहुण्यांनीही शाहू महाराजांना प्रश्न विचारले. तुम्ही जर छत्रपती घराण्यात नसता तर कोण बनला असता, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यांनी तात्काळ उत्तर दिले, मी छत्रपती नसतो तरीही जनतेची सेवाच केली असती. मी जनतेचा सेवकच आहे, अशा शब्दांत त्यांनी जनतेविषयीचे प्रेम व्यक्त केले.