कोबी, प्लॉवर, टोमॅटोची अधिक आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोबी, प्लॉवर, टोमॅटोची अधिक आवक
कोबी, प्लॉवर, टोमॅटोची अधिक आवक

कोबी, प्लॉवर, टोमॅटोची अधिक आवक

sakal_logo
By

74008
गडहिंग्लज : बाजारात बिबी फळाची आवक सुरू झाली असून खरेदी करताना ग्राहक. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

बोरे स्वस्त; हिरवी मिरची वधारली
तिळगुळ विक्री सुरू; सोलापुरातील बोरे, नागपुरच्या संत्र्याची आवक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : येथील भाजी मंडईत कोबी, प्लॉवर, वांगी, टोमॅटोची अधिक आवक आहे. तुलनेत हिरवी मिरची, काकडी यांचे भाव मागणीमुळे वधारले आहेत. उसाच्या लावणीतील मुबलक आवकेने पालेभाज्यांचे दर उतरलेलेच आहेत. कांदा बटाट्याचे दर स्थिर आहेत. फळबाजारात सोलापूरातून येणारे बोरे, तर नागपुरच्या संत्र्याची भरपूर आवक असल्याने दर स्वस्त आहेत. सक्रांतीसाठी तिळगुळाची विक्री सुरु झाली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून कोबी, प्लॉवर, टोमॅटोची मंडईत वाढलेली आवक कायम आहे. मागणीपेक्षा अधिक पुरवठा असल्याने दर घसरलेले आहेत. दर पडल्याने उत्पादकांत चिंता आहे. वाहतूक आणि काढणी खर्चाचा मेळ घालताना उत्पादकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. टोमॅटोचा घाऊक बाजारात अवघा सहा रुपये किलो असा दर आहे. कोबी वीस रुपये किलो, तर प्लॉवर १६० रुपये डझन आहेत. वांगी २०० रुपये दहा किलो आहेत. उत्पादक शेतकऱ्यांना आणलेला शेतीमाल घ्या अशी विनंती करण्याची वेळ आली आहे. परिणामी, विक्रेतेही मनमानी दराची मागणी करत आहेत. हिरवी मिरचीचा दर दहा किलोमागे १०० रुपयांनी वाढला आहे. कांदा २० ते ३५ तर बटाटा २५ ते ४५ रुपये किलो असा दर स्थिर आहे.
भेंडी, कारली, ढब्बू यांचा दर स्थिर आहे. कोंथिबिरीचा दर शंभर पेंढ्याना ६०० रुपये आहे. मेथी, लालभाजी यांचा शंभर पेंढ्याना २०० ते ३०० रुपये असा दर उतरलेला आहे. किळकोळ बाजारात ४ ते ५ रुपये पेंढी असा दर आहे. अधिक आवकेचा हा परिणाम आहे. फळबाजारात अँपल, चमेली बोरांची आवक जास्त आहे. तसेच गेल्या दोन महिन्यापासून संत्र्याची आवकही चांगली आहे. बोरे, संत्री ४० ते ६० रुपये किलो आहेत. सफरचंद १०० ते १२०, डाळींब, मोसंबी, पेरू ६० ते ८० रूपये किलो आहेत. शनिवारी (ता. १४) होणाऱ्या मकर संक्रातीमुळे तिळगुळाची विक्री सुरू झाली आहे. लगतच्या सीमाभागातून बिबी फळाची आवक सुरू झाली आहे. बिबी फळाच्या एका माळेचा २० ते २५ रुपये असा दर आहे.
-------------
चौकट
मटार, हरभरा वाढला
बाजारात मटार, ओला हरभऱ्याची आवक वाढली आहे. मटार ६० ते ८० रुपये किलो आहे. हरभऱ्याची पेंढीचा दर १५ ते २० रुपये आहे. ग्राहकांची मागणी असल्याने दर टिकून आहेत.