
आरोग्य केंद्र
एकामुळे रखडली १२ आरोग्य उपकेंद्रे
शिवाजी पेठेतील केंद्रासाठी महिनाभर चर्चा; वॉर्ड दवाखाना स्थलांतरासाठी प्रयत्न
कोल्हापूर, ता. ८ ः केंद्र सरकारकडून शहरासाठी मंजूर झालेल्या १२ आरोग्य उपकेंद्रांची प्रक्रिया केवळ एका केंद्राच्या जागेअभावी महिनाभर रखडली आहे. शिवाजी पेठ परिसरातील जुन्या वॉर्ड दवाखान्यात की महापालिकेला आरक्षणातून मिळालेल्या जागेवर उपकेंद्र करायचे हे निश्चित झालेले नाही. त्यासाठी खुद्द प्रशासकांनीही जागांची पाहणी केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र सरकारने शहरात १२ उपकेंद्र मंजूर केली आहेत. महापालिकेकडून पुरेसे मनुष्यबळ, औषधे, यंत्रसामग्री मिळत नसल्याने वॉर्ड दवाखान्यांकडून नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नाही. औषधे, डॉक्टर नसल्याने अनेकदा कर्मचारी बसून राहतात. अशा परिस्थितीत मंजूर झालेल्या उपकेंद्रांमुळे शहरात महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला पुन्हा बळ येण्याची चिन्हे आहेत. ही उपकेंद्रे महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतींमध्ये वा भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू करण्याचे महापालिकेने ठरवले. त्यानुसार ११ केंद्रांच्या जागा निश्चित केल्या आहेत. शिवाजी पेठ परिसरातील केंद्राच्या जागेचा मात्र अजूनही निर्णय झालेला नाही.
निवृत्ती चौक परिसरात महापालिकेचा छत्रपती महाराणी ताराराणी वॉर्ड दवाखाना आहे. तसेच खंडोबा तालीम मंडळाजवळील एका अपार्टमेंटमध्ये आरक्षणातून दोन जागा महापालिकेला मिळाल्या आहेत. यापैकी कोणती जागा निश्चित करायची यासाठी महिनाभरापासून घोळ सुरू आहे. वॉर्ड दवाखाना दुसरीकडे स्थलांतरित करून त्या जागी उपकेंद्र सुरू करावे, अशी स्थानिक माजी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे, तर वॉर्ड दवाखाना हलवण्यापेक्षा महापालिकेला मिळालेल्या इतर जागांमध्ये ते सुरू करता येईल, असे प्रशासनाचे मत आहे. यावरून मतमतांतरे आहेत. वॉर्ड दवाखान्यात केंद्र सुरू करता येणार नाही. त्यामुळे चार महिन्यांपासून जागा निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. ११ जागा निश्चित करून तिथे उपकेंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा करण्यासाठी अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण, १२ वी जागा निश्चित होत नसल्याने इतर सर्व केंद्राचे अंदाजपत्रक तयार होण्यास विलंब लागत आहे. अंदाजपत्रक तयार करून नंतर निविदा काढली जाणार असल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
....
कोट
शिवाजी पेठेतील वॉर्ड दवाखाना महापालिकेच्या जागेत स्थलांतरित करून त्या जागी उपकेंद्र बनवण्याचा प्रस्ताव उपसमितीसमोर ठेवला जाणार आहे. त्यातील निर्णयानंतर अंदाजपत्रक बनवून तातडीने निविदा प्रक्रिया राबवली जाईल.
-रविकांत आडसूळ, उपायुक्त, महापालिका
....
चौकट
उपकेंद्रांसाठी मिळणार
-१५ व्या वित्त आयोगातून
७ कोटी ४४ लाखांचा निधी
-प्रत्येकी २१ लाख रुपये.
-एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका,
लॅब टेक्निशियन, चतुर्थ श्रेणी कर्मचारी