
दुधाळ जनावरांच्या गटासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जिल्हा परिषद ... लोगो
...
दुधाळ जनावरांच्या गटासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
विशेष घटक योजना; ७५ टक्के देणार अनुदान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचा गट दिला जाणार आहे. ही योजना विशेष घटक विभागाकडून राबवली जात आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थीच यासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेसाठी १३ डिसेंबरपासून अर्ज मागवले आहेत. ११ जानेवारीला या योजनेची मुदत संपणार आहे. या योजनेसाठी संबंधितांनी ‘महाबीम्स’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.
दोन दुधाळ जनावर खरेदीसाठी प्रत्येकी ६३ हजार ७९६ रुपयांच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. एकूण ३९१ लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच, ७५ टक्के अनुदानावर १० शेळी व १ बोकड अशा गटासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी ३२१ लाभार्थी पात्र ठरणार आहेत. याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेतून एकात्मिक कुक्कुटविकास कार्यक्रमांतर्गत ८ हजार रुपयांच्या मर्यादेत ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील ५०० लाभार्थींना १०० एक दिवशीय कुक्कुट गट वाटप करण्यात येणार आहेत.