आकृतीबंधासाठी आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकृतीबंधासाठी आढावा
आकृतीबंधासाठी आढावा

आकृतीबंधासाठी आढावा

sakal_logo
By

आकृतिबंधासाठी विभागनिहाय माहिती
प्रशासकांना अहवाल सादर होणार; वेतन बोजाचा विचार होणार

कोल्हापूर, ता. १० ः महापालिका कर्मचाऱ्यांचा नवीन आकृतिबंध तयार करण्यासाठी आज प्रशासनाने विभागनिहाय आढावा घेतला. विभागात किती पदे कमी होऊ शकतात व किती नवीन पदांची आवश्‍यकता आहे याची लेखी माहिती घेतली. आरोग्य व वैद्यकीय विभागाला अभ्यास करून मागणी नोंदवण्यास सांगितली आहे. तसेच १२ विभागांकडून अद्याप माहिती दिलेली नाही.
प्रशासनातील अनेक विभागातील पदे कालबाह्य झाली आहेत. तरीही ती पदे दिसत असून रिक्त आहेत. परिणामी प्रशासकीय खर्च जादा होत असल्याने आवश्‍यक विभागात पदांची भरती करता येत नाही. त्यासाठी कालबाह्य झालेली पदे रद्द करून गरजेनुसार नवीन पदे निर्माण करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी रचना व कार्यपद्धती विभागाला युद्धपातळीवर आकृतिबंधाची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या महिन्यात दोनदा परिपत्रक काढूनही बहुतांश विभागांनी माहिती दिली नाही. यासाठी आज निवडणूक कार्यालयात सर्व विभागप्रमुखांना माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
त्यानुसार अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी आढावा घेतला. अनेक प्रमुखांनी विभागात किती पदे रद्द करता येतील व किती नवीन पदे पाहिजेत याची लेखी माहिती दिली आहे. बारा विभागांनी अजूनही माहिती दिली नसून तातडीने माहिती सादर करण्यास सांगितले आहे. रचना व कार्यपद्धती विभागाचे अधीक्षक प्रशांत पंडत यांच्याकडे लेखी माहिती दिली आहे. ती संगणकावर एकत्रित केली जाणार असून विभागाने जी मागणी नोंदवली आहे, ती आवश्‍यक आहे का याचा अभ्यास करून अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांकडून प्रशासकांना अहवाल सादर केला जाणार आहे. त्यातून आस्थापनाचा खर्च कसा होणार, वेतनाचा किती बोजा वाढणार याचा विचार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.
...................
चौकट
‘आरोग्य, वैद्यकीय’चा आकडा महत्त्वाचा
आरोग्य विभागात सफाई तसेच झाडू कामगार यांची संख्या मोठी आहे. तशीच वैद्यकीय विभागातील कर्मचारी संख्याही मोठी आहे. त्यामुळे या विभागात कितीची गरज आहे, त्यातून किती बोजा वाढणार आहे हे महत्वाचे आहे. त्यामुळे या विभागातील पदांचा आकडा महत्त्वाचा ठरणार आहे.