पंचमहाभूत उत्सव बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचमहाभूत उत्सव बैठक
पंचमहाभूत उत्सव बैठक

पंचमहाभूत उत्सव बैठक

sakal_logo
By

74582

पंचमहाभूत लोकोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ः मुंबईत बैठक, २० ते २६ फेब्रुवारीला कणेरी मठावर आयोजन


कोल्हापूर, ता. १० ः ‘कणेरी मठावर २० ते २६ फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीचा प्रारंभ होईल. या लोकोत्सवाच्या नियोजनात कुठलीही कमतरता राहणार नाही. लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यासंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत दिली.
बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आमदार महेश शिंदे आदी या बैठकीला उपस्थित होते.
या लोकोत्सवाच्या नियोजनासाठी पर्यावरण विभाग समन्वयक म्हणून काम करेल. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे नोडल अधिकारी म्हणून काम करतील. त्यांना सर्व विभाग सहकार्य करतील, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, ‘पर्यावरणीय समतोलाविषयी जनजागृती ही काळाची गरज आहे. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी ही गरज ओळखून या लोकोत्सवाचे नियोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्यावरण रक्षणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे पंचमहाभूत लोकोत्सव आणि जी-२०चे आयोजन हा योगही जुळून आला आहे.’
कणेरी मठाच्या माध्यमातून स्वामीजी अनेक लोकाभिमुख कामे अविरतपणे करत आहेत. लोकोत्सवात देशभरातून मान्यवर, स्वयंसेवक येणार आहेत. हा लोकोत्सव यशस्वी करण्याची आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. यासाठी मनुष्यबळ, लोकोत्सवासाठी पायाभूत सुविधा यापासून ते सर्व बाबींमध्ये शासनाच्या विविध विभागांचा सहभाग राहील, असेही शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आज या विषयाचे गांभीर्य आपण पाहिले तर संपूर्ण जग ज्या विषयावर विचार करते अशा पर्यावरण संतुलनाच्या विषयावर हा लोकोत्सव होत आहे. हा विषय सर्वसामान्यांपर्यंत या उत्सवाच्या माध्यमातून पोहोचेल. महाराष्ट्र शासनाने या लोकोत्सवासाठी विविध विभागांच्या माध्यमातून तयारी केली आहे. हा लोकोत्सव असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा या उत्सवात सहभाग आहेच.’
यावेळी कृषी, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पशुसंवर्धन, आरोग्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, ऊर्जा विभाग यांच्या सहभागाबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. सुरवातीला अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी प्रास्ताविक केले. प्रधान सचिव दराडे यांनी पूर्वतयारीबाबत सादरीकरण केले.
..............
दृष्टिक्षेपात पंचमहाभूत लोकोत्सव
सात दिवस चालणाऱ्या या लोकोत्सवात एकूण सात विषय, २५ पेक्षा जास्त राज्यांतील लोकांचा सहभाग, ५० पेक्षा जास्त देशांतील प्रमुख पाहुणे, विविध जिल्ह्यांतील ३०० पेक्षा जास्त संस्थांचा सहभाग, ५०० हून अधिक कुलगुरूंची उपस्थिती, हजारहून अधिक साधू संतांचा सहवास , १५०० शेती अवजारे व इतर वस्तूंची दालने, दहा हजार व्यावसायिकांचा सहभाग असणार आहे. ६५० एकर विस्तीर्ण परिसरात लोकोत्सव होणार आहे. त्यामध्ये २ लाख चौरस फूट जागेत मनोरंजन जत्रा, ३ लाख चौरस फूट जागेवर थ्री डी मॉडेल्सची मांडणी केली जाईल. सुमारे ४० लाख लोक या पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होतील, असे नियोजन असल्याची माहितीही संयोजकांनी दिली.
.............