खांडेकरी साहित्याचा असाही ऐतिहासिक विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खांडेकरी साहित्याचा असाही ऐतिहासिक विजय
खांडेकरी साहित्याचा असाही ऐतिहासिक विजय

खांडेकरी साहित्याचा असाही ऐतिहासिक विजय

sakal_logo
By

खांडेकरी साहित्याचा
असाही ऐतिहासिक विजय
मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ साहित्यिक वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर. कथा, कादंबऱ्या, रूपक कथा, लघुनिबंध, लेख-समीक्षा संग्रह, पत्रे, व्यक्ती आणि वाङ्‌मय, आत्मकथन, मुलाखत संग्रह, नाटक, कविता, व्यक्तिचित्रे, संपादित साहित्य अशा साहित्यातील सर्वच प्रकारांत वि. स. खांडेकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या साहित्याविषयीचा सर्वाधिक गाजलेला एक खटलाही आहे.
- संभाजी गंडमाळे
---------------

गेल्या दहा वर्षांत मेहता पब्लिशिंग हाऊसच्या माध्यमातून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी खांडेकरांचे विविध प्रकारचे अप्रकाशित साहित्यही वाचकांच्या भेटीस आणले आहे. मात्र, खांडेकरी साहित्याबाबतचा मराठी साहित्यात सर्वाधिक गाजलेला एक खटलाही आहे. प्रकाशकांकडून धमक्या देण्याचे प्रकारही यानिमित्त घडले होते आणि तब्बल ३० वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर या साहित्याचे सर्वाधिकार वारसांकडेच असल्याचा निकाल १२ वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला.
सत्तरच्या दशकात खांडेकरांचे साहित्य प्रचंड लोकप्रिय होते. त्या वेळी पुण्यातील देशमुख नावाच्या एका प्रकाशकांशी त्यांनी पुस्तके प्रकाशनाचा करार केला. त्यानुसार खांडेकर यांनी आपल्या ७२ पुस्तकांच्या प्रकाशनाचे हक्क देशमुख यांना दिले होते. खांडेकर हयात असेपर्यंत आणि पुढे त्यांच्या वारसांना त्याची रॉयल्टी देणे, पुस्तकांच्या आर्थिक व्यवहारांचे हिशेब वर्षाला देण्याचे या करारानुसार ठरले. २ सप्टेंबर १९७६ ला खांडेकरांचे निधन झाले. त्यानंतरही या देशमुखांनी पुस्तकांचे प्रकाशन सुरू ठेवले. मोठा नफा मिळवूनही खांडेकरांच्या वारसदारांना कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याचे त्यांनी नाकारले. करारातील अटींचा जाणीवपूर्वक भंग केला. रॉयल्टीसह पुस्तकांचे हिशेबही त्यांनी दिले नाहीत. त्यामुळे खांडेकरांच्या वारसदारांनी १९८१ मध्ये येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता. त्या वेळी प्रकाशकांनी ६० पुस्तकांच्या बाबतीत कर्तव्य पालन केलेले नाही, असा निकाल न्यायालयाने दिला. पुढे ही न्यायालयीन लढाई उच्च न्यायालय आणि सर्वोच न्यायालयातही गेली. २००० मध्ये उच्च न्यायालयाने, तर २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही वारसदारांच्या बाजूनेच निकाल दिला.

चौकट
सर्व पुस्तके ई-बुक्स स्वरूपातही
खांडेकरांचे सर्व साहित्य आता ई-बुक्स स्वरूपातही आहे. त्यालाही वाचकांचा मोठा प्रतिसाद आहे. ‘ययाति’, ‘अमृतवेल'', ‘पहिलं प्रेम'' अशा कादंबऱ्या असोत, ‘सरत्या सरी’, ‘स्वप्न आणि सत्य'', ‘फुले आणि काटे’, ‘जीवनकला’ असे कथासंग्रह असोत किंवा ‘कल्पलता’, ‘मंदाकिनी’, ‘तिसरा प्रहर’, ‘रानफुले’ लघुनिबंध संग्रह, ‘गाढवाची गीता आणि गाजराची पुंगी’ विनोदी लेखसंग्रह, ‘समुद्रमंथन'', ‘वैनतेय'' संग्रह असोत, त्याला आजही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. खांडेकरांचे साहित्य म्हणजे आजही उत्सुकतेने वाचले जाणारे अभिजात साहित्य असल्याचे मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता सांगतात.