
शहर सौंदर्यीकरणासाठी प्रयोग
वॉलपेंटिंग, दुभाजक रंगवण्यासाठी
पालिका उपलब्ध करून देणार रंग
शनिवारी उपक्रम; शहर सौंदर्यीकरणासाठी लोकांना साद
कोल्हापूर, ता. ११ : आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसावे, ही प्रत्येक शहरवासीयांची इच्छा असते. तिला मूर्तस्वरूप देण्यासाठी महापालिका येत्या शनिवारी (ता.१४) लोकसहभागाचा प्रयोग करणार आहे. महावीर कॉलेज ते पोस्ट ऑफिस चौक दरम्यानच्या रस्त्यावर वॉलपेंटिंग, तसेच फूटपाथ, दुभाजक रंगवण्यासाठी महापालिका रंग उपलब्ध करून देणार आहे. कॉलेज, शाळांचे विद्यार्थी, तसेच संघटनांच्या कार्यकर्त्यांना बोलवून ते रंगवून घेण्यात येणार आहे. या प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद पाहून शहरातील विविध रस्त्यांवरही या प्रकारचे नियोजन केले जाणार आहे.
शहरातील दुभाजक, फूटपाथ निविदा काढून रंगवायचे म्हटल्यास त्याला मोठा खर्च येतो. त्याऐवजी महापालिकेने रंग उपलब्ध केले व लोकसहभागातून काम करता येऊ शकते, ही उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी संकल्पना आहे. गेल्या दोन शनिवार, रविवारी काही कॉलेजना सोबत घेतले व त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला. त्यावेळी हा प्रयोग करण्याचे ठरवण्यात आले. महावीर कॉलेज ते पोस्ट ऑफिस चौक या रस्त्यावरील भिंत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पांढऱ्या रंगाने रंगवून घेतली जाईल. त्यावर विविध कलाकृती रंगवण्यासाठी महापालिका त्यादिवशी रंग उपलब्ध करून देणार आहे. कला महाविद्यालयातील, कॉलेज, शाळांमधील कला शिक्षक, विद्यार्थ्यांकडून पांढऱ्या भिंतीवर चित्रे आखून घेतली जातील. त्या चित्रांमध्ये अन्य शहरवासीयांनी केवळ रंग भरायचे आहेत. प्रयोगासाठी घेतलेल्या भिंतीसाठी किती रंगाची आवश्यकता आहे, त्याचा अंदाज घेतला जाणार आहे. तसेच हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे लोकांची उपस्थिती. दोन दिवस केवळ दोन तास यासाठी दिले तर अनेक रस्त्यांचा परिसर सुशोभित होऊ शकतो.
----------------
चौकट
रंगही मिळतील, माणसेही मिळतील...
गेल्या काही महिन्यांपासून महापालिका स्वच्छता अभियान राबवत आहे. त्यामध्ये विविध संघटना सहभागी होतात. आता त्या संघटनांना आवाहन केले, तर शहराचे सौंदर्य वाढवण्याचे योगदान देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहतील. शहर सौंदर्यीकरणाची एक चळवळ उभी राहू शकते. या प्रयोगासाठी लागणाऱ्या रंगांसाठीही आवाहन केले तर तेही शहरवासीय उपलब्ध करून देऊ शकतील.