हसन मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ

sakal_logo
By

‘ईडी, प्राप्तिकर’
चालवतंय कोण?
मुश्रीफ; ना नोटीस; ना समन्स!

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ११ : चार वर्षांपूर्वी प्राप्तिकर विभागाने बेनामीची कारवाई सुरू केली होती. त्याला वरिष्‍ठ न्यायालयाने स्‍थगिती दिली होती. त्यानंतर आरओसीने शेल कंपन्यांबांबत खटला दाखल केला होता. तो तर निकालातच काढला. असे असताना आता परत नोटीस न देता, समन्‍स न काढता छापे टाकण्याचे कारण काय, असा सवाल करत ईडी, प्राप्तिकर विभाग चालवतोय कोण, असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. ईडीने केलेल्या कारवाई संदर्भात ते बोलत होते. ते, सध्या मुंबईत आहेत.
नबाब मलिक, अस्‍लम शेख व हसन मुश्रीफ अशा लोकांनाच टार्गेट केला जात असल्याचा आरोप करत ते म्‍हणाले, ‘‘आज सकाळी सहापासून ईडीने छापे टाकले आहेत; मात्र हे करण्यापूर्वी कुठेही गुन्‍हा नोंद केलेला नाही. समन्‍स काढलेले नाही. नोटीस दिलेली नाही. त्यामुळे ईडीने ही छापेमारी का केली, हे समजत नाही.’’ ते म्‍हणाले, ‘‘जे साखर कारखाने उभारण्यात आले, ते शेतकऱ्‍यांच्या पैशातून उभारले आहेत. अशाच पद्ध‍तीने घोरपडे कारखान्याची उभारणी झाली आहे. गडहिंग्‍लज कारखाना ब्रिक्‍स कंपनीने चालवायला घेतला. शासनाने तो दिला होता; पण तोटा आल्याने या कंपनीने साखर कारखाना चालवणे बंद केले. आता या ठिकाणी संचालक मंडळ कार्यरत आहे. या कारखान्यांशी आपला काहीही संबंध नाही.’’

छाप्यामागे कोण, हे जनतेला माहीत!
कागल येथील एक कार्यकर्ते दीपक मगर यांनी आमचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांना आमदार मुश्रीफ यांच्यावर ईडीचे छापे पडणार असल्याचे चार दिवसांपूर्वी सांगितले होते. आमचे नेते दिल्‍लीला यासाठीच गेले होते, असे मगर यांनी सांगितले. त्यानंतरच छापे पडले आहेत. त्यामुळे याच्यामागे कोण आहे, हे जनतेला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
आजपर्यंत आपणाला प्राप्तिकर विभाग, आरओसीने चौकशीला बोलावले; मात्र पुढे काही कारवाई झालेली नाही. आजच्या छाप्यामागे नेमका काय हेतू आहे, हे माहिती नाही. आजपर्यंत मला कधीच चौकशीला बोलावण्यात आलेले नाही; मात्र मुलाला चौकशीसाठी बोलावले होते, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

ती चौकशी न्यायालयाकडूनच रद्द
किरीट सोमय्‍या यांनी पुन्‍हा नव्याने आरोप केले आहेत. सोमय्‍यांवर यापूर्वीच दीड कोटींच्या बदनामीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्‍ट आहे. मी मंत्रिपदाच्या कार्यकाळात काळा पैसा मिळवला व तो कारखान्याकडे वळवला, असा आरोप आता सोमयय्‍या केला आहे. ते ज्या शेल कंपन्यांचा उल्‍लेख करतात, त्याबाबत आरओसीने चौकशी सुरू केली होती. ही चौकशी न्यायालयाने रद्द केली आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

मग भाजपनेच चौकशी करावी!
चंद्रकांत गायकवाड हे माझे पुण्यातील मित्र आहेत; पण त्यांच्यासोबत कोणतीही व्यावसायिक भागीदारी नाही. ग्रामविकास मंत्री असताना कर संकलनाचे ठेके देण्यात आले. ते नंतर रद्द करण्यात आले. त्याचा आमच्या जावयाशी काहीही संबंध नाही. तरीही त्यांचे नाव यामध्ये गोवले जात आहे. आज भाजपची सत्ता आहे. त्यांच्याकडे हे खाते आहे. या प्रकरणाची त्यांनी चौकशी करावी, असे आव्हानही मुश्रीफ यांनी दिले.