कारवाई करा अन्यथा आंदोलन ः ॲड.बाबा इंदुलकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारवाई करा अन्यथा आंदोलन ः ॲड.बाबा इंदुलकर
कारवाई करा अन्यथा आंदोलन ः ॲड.बाबा इंदुलकर

कारवाई करा अन्यथा आंदोलन ः ॲड.बाबा इंदुलकर

sakal_logo
By

74900
कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ॲड. बाबा इंदुलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन
ॲड. बाबा इंदुलकर; प्रदूषण नियंत्रण मंडळाला इशारा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : पंचगंगा नदी प्रदूषण वाढत आहे. मासे मरण्याचा प्रकार दरवर्षी घडतो. शहरात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणावर कारवाई केली? तुमचे काम फक्त नमुने गोळा करणे आणि नोटीस पाठवणे एवढेच उरले आहे. २४ जानेवारीपर्यंत जर प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करणार आहोत, असा इशारा ॲड. बाबा इंदुलकर यांनी दिला. कोल्हापूर शहर व जिल्हा तीन आसनी प्रवासी रिक्षा व्यावसायिक समितीच्यावतीने याबाबतचे निवेदन देण्यात आले. प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी हे निवेदन स्वीकारले.
ॲड. इंदुलकर म्हणाले, ‘‘शहरात गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदले आहेत. त्यामुळे हवेत धुलिकणांचे प्रमाण अधिक आहे. याची नोंद तुम्ही घेतली नाही. याला जबाबदार असणाऱ्यांवर तुम्ही कारवाई केली नाही. त्यामुळे शहरातील हवा प्रदूषित होत आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्यावर आम्ही गेल्यावर्षी मोठे आंदोलन केले; मात्र तुम्ही कोणतीच कारवाई केलेली नाही. केवळ नमुने गोळा करणे आणि नोटीस पाठवणे एवढीच कार्यवाही केली जाते. त्यामुळे मासे मरण्यासाठी, नदी प्रदूषणासाठी जे घटक कारणीभूत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा २४ जानेवारीला तीव्र आंदोलन करू.’’ यावेळी सुभाष शेटे, ॲड. बाबा इंदुलकर, ईश्‍वर चेने, अविनाश दिंडे, जाफर मुजावर, श्रीकांत पाटील, अमित अतिग्रे हे उपस्थित होते.
-------------------
चौकट
महापालिकेवर कारवाई का नाही?
महापालिकेकडून प्रदूषण प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होते. शहरातील हवेची तपासणी होत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रशासकांना घाबरते. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवली जात नाही. यापूर्वी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून महापालिकेचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. याची पुनरावृत्ती होणार का? असा प्रश्‍न यावेळी उपस्थितांना मांडला.