मकर संक्रांत वाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मकर संक्रांत वाण
मकर संक्रांत वाण

मकर संक्रांत वाण

sakal_logo
By

7527, 75275

गुळ, शेंगा अन् मिक्स ड्रायफ्रुटची चिक्की...
संक्रांतीच्या वाणासाठी विविध प्रकार; खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः संक्रांत म्हंटले की महिलांचा हळदी-कुंकुचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्याची तयारी पंधरा दिवसांपासून सुरू होते. त्यामध्ये वाण कसे वेगळ्या पद्धतीचे असेल, याकडे महिलावर्गाचा कल असतो. त्यासाठी बाजारपेठेतही विविध पर्याय उपलब्ध असून, त्याची खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे.
तीळ आणि गुळ एकत्र करुन खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहाते. संक्रांतीच्या वेळी हिवाळा असल्याने याचा शरीराला फायदा होतो. याच गोष्टीचा विचार करता विक्रेत्यांनी शेंगदाण्याची, तिळाची व मिक्स ड्रायफ्रुटच्या चिक्की तसेच गुळाचे हॅम्पर्सही बनविले आहेत.
दहा रूपयांपासून ते पाचशे रूपयांपर्यंतच्या वाणाच्या वस्तू उपलब्ध आहेत. त्यासोबतच तिळगुळासोबत शेंगदाण्याची, तिळाची आणि मिक्स ड्रायफ्रुटच्या चिक्कीलाही मोठी मागणी आहे.संक्रांतीचा सण हा प्रत्येक जण वेगळ्याच उत्साहात साजरा करतो. प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या असतात. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत असतानाच काही महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. त्याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी पाच, सात, अकरा, एकवीस याप्रमाणे महिलांना बोलावून वाण देण्यात येते. वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देणे. अनेक घरातील महिला संक्रांतीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या महिलांना भेटवस्तू देतात. त्यात लहान वस्तू ज्या घरात उपयोगी येणाऱ्या किंवा महिलांच्या कामात येणाऱ्या असतात. तसेच कोणी हातरुमालाबरोबर गजरा, प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये तिळगूळ टाकून देतात. संक्रांतीला वाण देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूमध्ये विविध प्रकार बाजारात आले आहेत. त्यात ज्वेलरी बॉक्स, छोट्या पर्सेस, लिपस्टिक्स, टिकल्यांचे पाकिट, छोटे - मोठे डबे, हँकी, दागिने, रेसिपी बुक, साडी कव्हर, घर साफ करण्याचे हँड डस्टर या प्रकारच्या वस्तू बाजारात आहेत.

चौकट
पर्यावरणपूरक ‘वाणा’ला पसंती
प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी कापडी पिशव्यांमध्ये प्रचंड वैविध्य आले आहे. वाण म्हणून देण्यासाठी अशा पिशव्या मोठ्या संख्येने विकत घेण्यासाठी महिला बचतगटांना काम मिळाले आहे. यामुळे गरजू महिलांना रोजगार मिळाला आहे. छोटी घडी होणाऱ्या पिशव्यांना पसंती मिळत आहे. तसेच भाज्यांसाठी कप्पे असलेल्या कापडी पिशव्यांचीही निवड वाण देण्यासाठी केली जात आहे. पेपरक्विलिंग हा सध्याचा कलात्मक प्रकार संक्रातीच्या वाण यादीत आला आहे. यामध्ये तयार होणाऱ्या दागिन्यांचे सेट संक्रातीच्या वाण संस्कृतीला पर्यावरणपूरक टच देत आहेत. अशा प्रकारचे दागिने बनवणाऱ्या महिलांना सध्या ऑर्डर आहे. कागदाच्या लगद्यापासून बनवलेले कॅसेरोल, पॉट, मूर्ती, वॉलहँगिंग, तोरण वाण म्हणून देताना पर्यावरण जपण्याचा संदेशही दिला जात आहे.
-------
कोट
मिनी मेटलचे बास्केट, आर्टिफिशयल फुलांचा छल्ला त्यासोबतच पर्यावरणपूरक वाणांना मोठी पसंती मिळते आहे. काही महिलांनी प्री-ऑर्डर्स देऊनच वाण तयार करण्यासंबधी सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच तिळगुळाच्या दागिन्यांनाही मोठी मागणी आहे.
-सुजाता परदेशी, विक्रेत्या