राजेश क्षीरसागर- वाढावा पान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेश क्षीरसागर- वाढावा पान
राजेश क्षीरसागर- वाढावा पान

राजेश क्षीरसागर- वाढावा पान

sakal_logo
By

७५३२६
मुंबई ः येथील बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कॉफीटेबल बुकचे अनावरण करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर. शेजारी नेव्हिल संघवी, आशिष गांधी, जसपाल बिंद्रा, श्रीराम दांडेकर, राजेंद्र कोठारी, सचिन शहा, अमित कुमार आदी.

भारताला महासत्ता बनविण्यासाठी
‘बॉम्बे इंडस्ट्रीज''चे योगदान महत्त्वपूर्ण
---
राजेश क्षीरसागर; असोसिएशनच्या कॉफीटेबल बुकचे अनावरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : गेली ७५ वर्षे मुंबईच्या विकासात हातभार लावणाऱ्या बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. देश अमृतमहोत्सव वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्त देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यात असोसिएशन महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, ‘मित्र'' संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कॉफीटेबल बुकचे अनावरण श्री. क्षीरसागर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.
श्री. क्षीरसागर म्हणाले, ‘‘संपूर्ण पश्चिम भारतातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रातील सुमारे एक हजार ३०० पेक्षा अधिक सभासद असणारी संघटना आहे. अनेक वर्षांपासून रोजगार निर्मिती, आयात-निर्यात, अत्याधुनिक उत्पादने याद्वारे राज्यासह देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम असोसिएशनने केले आहे. यासह आजच्या गरजा आणि तंत्रज्ञान विचारात घेऊन या असोसिएशनने राबविलेले अनेक उपक्रम उल्लेखनीय आहेत. त्याचमुळे ही संघटना जागतिक स्पर्धेत आपला ठसा उमटवत पाय रोवून उभी आहे, हे भावी युवा पिढीसाठी फायदेशीर आहे. देशाची अर्थव्यवस्था दोन ट्रिलियनवरून पाच ट्रिलियनवर जाते, तेव्हा कोणत्याही राष्ट्रातील सर्वोच्च बुल मार्केट होते. आजतागायत फक्त तीन देशच अशी कामगिरी करू शकले आहेत.’’
विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांनाही २०४७ पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राची २०२७ पर्यंत एक ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत साडेतीन ट्रिलियन डॉलरपर्यंत पोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. देशाच्या सकल उत्पन्नात राज्याचा वाटा १५ टक्के आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी भारत सरकारमार्फत कार्यरत असलेल्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यातही अशा संस्थेची स्थापना करण्याबाबतच्या सूचना नीती आयोगाकडून देण्यात आल्या. त्यानुसार महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली असून, राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक आणि कार्यात्मक दिशा देण्याची जबाबदारी या संस्थेच्या माध्यमातून आमची आहे. राज्यातील नवनवीन प्रकल्प आणि धोरणात असोसिएशनच्या प्रतिनिधींना विचारविनिमय करण्यासाठी समाविष्ट करण्यात यावे, या मागण्यांसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याची चर्चा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
दरम्यान, श्री. क्षीरसागर यांची राज्याच्या ‘मित्र'' संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे सत्कार झाला. या वेळी बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष नेव्हिल संघवी, नूतन अध्यक्ष आशिष गांधी, सेंट्रम ग्रुपचे चेअरमन जसपाल बिंद्रा, कोकुयो कॅमलिन लिमिटेडचे व्हॉइस चेअरमन श्रीराम दांडेकर, बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोठारी, सचिन शहा, अमित कुमार आदी उपस्थित होते.