
गोवर लसीकरण
शहरात उद्यापासून गोवर रुबेला
लसीकरणाचा दुसरा टप्पा
कोल्हापूर, ता. १३ : शहरात १५ जानेवारीपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वंचित राहिलेल्या मुलांचे लसीकरण २५ जानेवारीपर्यंत करण्यात येईल.
शासनाच्या निर्देशानुसार या टप्प्यात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत ए.एन.एम. यांच्याकडून ऊसतोड कामगार, वीटभट्टी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कुटुंबांच्या ठिकाणी भेट देण्यासाठी मोबाईल टीम तयार केली आहे. पहिला टप्प्यात डिसेंबर २०२२ अखेर सात हजार ८२२ मुलांना पहिला व सात हजार ६८८ मुलांना दुसरा डोस दिला असून, सात हजार ५१० लाभार्थींना व्हिटॅमिन ए देण्यात आले.
गोवर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून, ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, चेहऱ्यावरील आणि शरीरावर लाल सपाट पुरळ अशी लक्षणे आहेत. रुग्णाच्या संपर्कात आल्यावर १० ते १२ दिवसांनंतर लक्षणे दिसतात. लक्षणे आढळल्यास नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यावी. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क करण्याचे निर्देश दिले आहेत. वंचित मुलांच्या पालकांनी पात्र बालकांना लस पाजून सुरक्षित करावे, असे आवाहन केले आहे.