कुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुस्ती
कुस्ती

कुस्ती

sakal_logo
By

कोण होणार महाराष्ट्र केसरी?
---
आज फैसला; गायकवाड, शेख, सदगीर, राक्षे उपांत्य फेरीत
युवराज पाटील- अनीश कुलकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १३ : माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख; तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही गटांतील मल्ल एकमेकांशी लढून ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दावेदारी दाखल करतील. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी प्रयत्नशील असेल. उद्या (ता. १४) सायंकाळी सातला मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होईल. या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, शुभम सिदनाळे व अरुण बोगार्डे यांचा पराभव झाल्याने स्पर्धेतील कोल्हापूरचे आव्हान संपुष्टात आले. (कै.) मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे.
सिकंदर शेखने या स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्याने बाला रफिक शेखला काही सेकंदांमध्ये चितपट केले. बाला रफिकने पहिल्यापासून आक्रमक रूप धारण केले. त्याने पहिल्यांदा सिकंदरवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला दोन गुण मिळाले. मात्र, खचून जाईल तो सिकंदर कसला? अवघ्या काही सेकंदात आपले कौशल्य पणास लावून त्याने दुहेरी पट काढत बाला रफिकला अस्मान दाखविले. महेंद्र गायकवाडने कोल्हापूरच्या शुभम सिदनाळेला प्रेक्षणीय कुस्ती करून चितपट केले.
गादी विभागात रोमहर्षक लढती झाल्या. ब्राँझपदकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख गैरहजर राहिल्याने शुभम सिदनाळे याला पदक बहाल करण्यात आले. पुण्याच्या शिवराज राक्षे याने गणेश जगतापला पराभूत करून गादी विभागातील अंतिम फेरीचे स्थान पक्के केले. गादी विभागातील दुसऱ्या लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने पुण्याच्या तुषार दुबेला तांत्रिक प्राबल्यावर हरविले.
माती विभागातून झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने कोल्हापूरच्या शुभम सिदनाळेला पराभूत केले. मैदानात उतरल्यावर दोन्ही मल्लांनी एकमेकांना केवळ दहा सेकंदच आजमावले. त्यानंतर महेंद्रने थेट एक टांग डाव टाकला अन शुभमचा तोल गेला. त्याक्षणी मिळालेल्या संधीचा फायदा करून घेताना महेंद्रने शुभमला थेट चितपट करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.
गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पुणे जिल्ह्याच्या तुषार डुबेला ५-० असे पराभूत केले. तुषारने निष्क्रिय कुस्ती केल्याने एक गुण हर्षवर्धनला देण्यात आला. त्यानंतर कटऑफमुळे हर्षवर्धनला पुन्हा एकदा एक गुण मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा तुषारच्या निष्क्रिय खेळामुळे हर्षवर्धनला एक गुण मिळाला. पहिल्या फेरीत हर्षवर्धनने ३ -० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत हर्षवर्धनने तुषारवर ताबा मिळविताना अजून दोन गुण वसूल केले.
दुसऱ्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने हिंगोलीच्या गणेश जगतापला ११-१ असे पराभूत केले. पहिल्या फेरीत शिवराजने तीन वेळा गणेशला मैदानाबाहेर ढकलताना तीन गुणांची कमाई केली. त्या वेळी गणेशने एकदा शिवराजला मैदानाबाहेर ढकलत एक गुण वसूल केला. त्यानंतर शिवराजने दुहेरी पट काढताना दोन गुण मिळविताना ५-१ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत मात्र शिवराजने अजून आक्रमक खेळ करताना गणेशवर ताबा मिळवत दोन, झोळी डावावर दोन आणि कुस्ती धोकादायक स्थितीत नेऊन दोन असे तब्बल सहा गुण वसूल केले.

कोल्हापूरच्या गोंगाणेला सुवर्णपदक
अन्य एका वजन गटातून कोल्हापूरच्या सोनबा गोंगाणे याने सुवर्णपदक (गादी विभाग), तर याच गटातून शुभम पाटील याने पदकाची कमाई केली. माती विभागातून साताप्पा हिरुगडे याने रौप्यपदक मिळविले.