
एसटी
फाइल फोटो
....
एसटी वेतनाचा मार्ग मोकळा
वेतन विलंबाचे राजकारण प्रवाशांच्या मुळावर
कोल्हापूर, ता. १४ : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या सात तारखेला करण्यात येईल, अशी हमी राज्य शासनाने न्यायालयात दिली होती. तरीही यंदा जानेवारी महिन्यात वेतन होण्यासाठी विलंब झाला. यावरून जोरदार टीका सुरू झाली आणि एसटीचा वेतनाचा प्रश्न गाजू लागला. त्याची दखल घेत शासनाने एसटीला वेतनासाठी अडीचशे कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन या महिन्यात होऊ शकले.
एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची हमी देणारे तत्कालीन सत्ताधारी आज विरोधक आहेत. तर एसटी कर्मचाऱ्यांना वेळीच वेतन मिळाले पाहिजे तसेच त्यांच्या विलीनीकरणाचा आग्रह धरणारे तत्कालीन विरोधक आज सत्ताधारी आहेत. या दोघांमध्येही गेल्या पाच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला झालेल्या विलंबावर कलगीतुरा रंगला होता. यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्याच्या सत्ताधाऱी तसेच विलीनीकरण मागणीच्या आंदोलनात पुढाकार घेणाऱ्यांवरही टीका केली. जेव्हा आम्ही सत्तेत होतो त्यावेळी रोज आंदोलनाला बसत होतात, आम्ही पुढाकार घेऊन एसटी कामगारांच्या वेतनासाठी निधी दिला. वेतन वेळेत झाले. आता सत्ता बदलली आणि वेतनास विलंब झाला याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यावरून एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न चांगलाच तापला.
वास्तविक कोरोना काळ व विलानीकरण संप काळात दीर्घकाळ प्रवासी सेवा बंद होती. यातून एसटीचा तोटा दोन हजार कोटींवर गेला. याच काळात एसटीचा प्रवासी वर्ग निम्म्याने घटला. रोज अडीच हजार गाड्या यंत्रशाळेत असल्याने पंधरा हजार गाड्यातून अवघ्या ३५ लाख प्रवाशांची वाहतूक होते आणि यातून मिळणारा रोजचा आठ कोटी रुपयांच्या महसुलापैकी ७० टक्के महसूल इंधन व टोल कर यातच जातो. त्यामुळे एसटीचा तोटा अद्यापी कायम आहे. परिणामी इथून पुढेही कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या मदतीशिवाय वेतन मिळणे मुश्कील दिसते.
.....
एसटीला नवे आर्थिक
स्त्रोत उपलब्ध व्हावेत
राज्य शासनाकडून येणारा निधी केवळ वेतनावरच खर्च होऊ लागला तर नव्या गाड्या घेणे व अधिक सक्षम प्रवासी सेवा देणे यालाच खीळ बसण्याची शक्यता आहे. असा पेच सोडवण्यासाठी एसटीला टोल करमुक्त करणे, इंधन दरात सवलत देणे व एसटीला नवे आर्थिक स्त्रोत उपलब्ध करून देणे, यावर सत्ताधारी व विरोधक भाष्य करतील का? याची वाट एसटी कर्मचारी व प्रवासी पाहत आहेत.