
मकर संक्रांत साजरी
75845/ 75854
तीळगुळाचा गोडवा,
स्नेह वाढवा!
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः ‘आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा’ अशा शुभेच्छा देत घराघरांत तिळगुळ वाटण्यात आले. तिळगुळ घ्या, गोड बोला म्हणत वाटलेल्या तिळगुळांने स्नेहाची गोडी आणखी वाढली. थोरामोठ्यांचा आशिर्वाद घेत लहान मुलांनी उत्साहात मकर संक्रांती साजरी केली.
महाविद्यालयांना रविवारची सुट्टी असली तरी मुला- मुलींच्या ग्रुपनी एकमेंकाना तिळगुळ देत स्नेहाचा गोडवा वाढवला. दरम्यान, करवीर निवासिनी श्री अंबाबाईची तिळगुळाच्या दागिन्यांची सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्री अंबाबाईच्या चरणी तिळगुळ वाहण्यासाठी सकाळपासून मंदिरात मोठी गर्दी केली.
मकर संक्रांती यंदा रविवारी आल्याने सुटी असल्याने तरूणांनी उद्या (ता. १६) महाविद्यालयात मित्रपरिवार आणि शिक्षकांबरोबर साजरा करण्याचे नियोजन केले आहे. तरूणाईने मित्र- मैत्रिणींना हॉटेल, बगीचा येथे भेटून तिळगुळ, तिळाच्या वड्या, लाडू देऊन शुभेच्छा दिल्या. दिवसभर फेसबुक, व्हॉटसॲपवरून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा संदेश पाठवले जात होते.
मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे महत्व ओळखून महिला वर्गाने काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यास पसंती दिली. नथ, हिरव्या बांगड्या, केसात गजरा आणि अंगावर तिळगुळाचे दागिने परिधान करून महिलांनी हळदी कुंकुसोबत वाणही दिले. सायंकाळी नवनवे कपडे परिधान केलेल्या बच्चे कंपनीने छोट्या डब्यातून तिळगुळ वाटप केले.
चौकट
घरोघरी ओवसा पूजन
घरांघरांत सुवासिनींनी बुंडुकलीत बोरं, ऊस, गाजर, वटाणे, शेंगा आणि तीळगुळ घालून ओवश्याचे पुजन केले. तसेच पुरणपोळी, शेंगदाण्याची पोळी असा गोडाधोडाचा नैवेद्यही दाखविण्यात आला.