मुश्रीफ बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुश्रीफ बातमी
मुश्रीफ बातमी

मुश्रीफ बातमी

sakal_logo
By

‘इडी’च्या कारवाईमागे मोठे षडयंत्र
---
हसन मुश्रीफ; सोमय्यांचा व्हिडिओ ट्विट करीत आरोप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः माझे घर, साखर कारखाना व इतर ठिकाणी पडलेल्या ‘इडी’च्या छाप्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केला असून, त्यात ते प्रतिक्रिया देताना दिल्लीचा उल्लेख करीत असल्याचे म्हटले आहे.
बुधवारी (ता. ११) मुश्रीफ यांच्या घरावर पहाटे साडेसहाला ‘इडी’चा छापा पडला. ‘इडी’ची कारवाई सुरू असतानाच एका न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधींनी सोमय्या यांच्याशी संपर्क साधला असता संबंधितांना प्रतिक्रिया देण्यापूर्वी सोमय्या हे कोणाशी तरी फोनवर बोलत होते. त्यात ‘हसन मुश्रीफच्या घरावर रेड सुरू झाली आहे, दिल्लीवाल्यांनी कमिटमेंट पूर्ण केली’ असा उल्लेख आहे. सोमय्या यांच्या या वक्तव्यावरून आपल्या कारवाईमागे किती मोठे षडयंत्र होते, याचा हा धडधडीत पुरावा असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
मुश्रीफ यांचे निवासस्थान, साखर कारखान्यासह त्यांच्या पुणे, कोल्हापुरातील नातेवाइकांच्या घरांवर बुधवारी ‘इडी’चा छापा पडला. त्या वेळी मुश्रीफ हे मुंबईत होते. तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर ‘इडी’चे पथक त्यांच्या घरातून बाहेर पडले. या कारवाईविरोधात मुश्रीफ यांनी यापूर्वीच प्रतिक्रिया दिली आहे. आज यातील सोमय्या यांचा नवा व्हिडिओ व्हायरल करून त्यांनी यामागे षडयंत्र असल्याचा आरोप केला.
सोमय्या हे उद्या (ता. १६) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मुश्रीफ यांनी हा व्हिडिओ ट्विट केला. उद्या यावर सोमय्या काय प्रतिक्रिया देणार, याविषयी उत्सुकता असेल.
.........