
शिष्यवृत्ती परीक्षा- नकुशी देवकरांची यशकथा
75878
कोल्हापूर : बाचणी (ता. करवीर) येथील शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या तान्हुल्याला बरोबर घेवून शिष्यवृत्ती परीक्षेचे धडे देताना नकुशी देवकर.
तान्हुल्याला बरोबर घेवून शिष्यवृत्तीचे धडे
विद्यार्थी चमकले जिल्हा यादीत; बाचणी शाळेतील नकुशी देवकरांचा आदर्श
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : बाचणी (ता. करवीर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका नकुशी देवकर यांनी यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निमित्ताने आदर्श दिला आहे. बाळंतपणानंतर सतराव्या दिवशीच त्या शाळेत आल्या आणि विद्यार्थ्यांना एकही रजा न घेता मार्गदर्शन केले. परिणामी नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात या शाळेचे दोन विद्यार्थी राज्या, तर अकरा विद्यार्थी जिल्हा यादीत चमकले.
बारा मार्च २००९ रोजी सातारा जिल्ह्यातील वाघेश्वर शाळेत देवकर नोकरीत रूजू झाल्या. या शाळेत महाराष्ट्रातील पहिला सेमी इंग्रजी वर्ग त्यांनी याच वर्षी सुरू केला. सकाळी साडेसातपासूनच विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन सुरू केले. शाळेतील सात विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली, तर चौदा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले. जुलै २०१७ साली त्यांची बदली बाचणी येथील शाळेत झाली. पहिलीच्या वर्गापासून त्यांनी शिकवायला सुरवात केली. त्या तिसरीच्या वर्गावर शिकवत असताना कोरोना आला आणि शाळा बंद झाल्या. मात्र, शाळा बंद ठेवून मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी त्यांनी पालकांशी संवाद साधून महाराष्ट्रातील पहिला ऑनलाइन वर्ग सुरू केला. त्यामुळे चौथीचे पंचवीस विद्यार्थी प्रज्ञाशोध परिक्षेत गुणवत्ताधारक ठरले.
-------------
चौकट
संघर्षकथा अशी बनली यशकथा...
पाचवीचा वर्ग त्यांच्याकडे आला आणि त्याचवेळी त्यांचे बाळंतपणही. नऊ डिसेंबर २०२१ ला करवीर तालुक्याची पहिली सराव चाचणी होती आणि आठ डिसेंबरला दिवसभर कळा येत असतानाही त्या अध्यापनात व्यस्त होत्या. सायंकाळी पावणेसातला त्यांनी वर्ग सोडला. घरी आल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्रसुती झाली. त्यानंतर सतराव्या दिवशीच त्या पुन्हा शाळेत रूजू झाल्या. आपल्या तान्हुल्या बाळाला माहेरी ठेवून ठिकपूर्ली ते बाचणी असा प्रवास त्यांनी पंधरा दिवस केला. पुढे २८ फेब्रुवारीला बाळाला घेऊन त्या बाचणीतच रहायला आल्या आणि विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अध्यापनाला प्रारंभ केला. नुकताच परीक्षेचा निकाल लागला आणि या शाळेचे दोन विद्यार्थी राज्यात व अकरा विद्यार्थी जिल्हा यादीत चमकले. एकतीस पैकी २९ विद्यार्थ्यांना दोनशेहून अधिक गुण मिळाले. याच वर्गातील अकरा विद्यार्थी सैनिक स्कूलला आणि दोन विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी निवडले गेले.