‘गोशिमा’त अग्नीशमन दल प्रतिक्षेतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोशिमा’त अग्नीशमन दल प्रतिक्षेतच
‘गोशिमा’त अग्नीशमन दल प्रतिक्षेतच

‘गोशिमा’त अग्नीशमन दल प्रतिक्षेतच

sakal_logo
By

जागा आहे; फायर स्टेशन नाही!
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील चित्र; जीवितहानी घडल्यावर जाग येणार काय?
लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : नुकताच गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत परिसरात आगीचे तांडव पाहायला मिळाले. या अग्नी तांडवाने औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशामक दलाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या वतीने अग्निशमन दलासाठी (फायर स्टेशन) राखीव जागा ठेवली आहे. मात्र तेथे फायर स्टेशन उभारण्यासाठी निधी नसल्याची शोकांतिका आहे. पुन्हा एकदा घटना घडली आणि त्यामध्ये जीवितहानी झाली तर जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
एखादी घटना घडल्यानंतर सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या होतात. त्यानंतर उपाययोजना सुरू होतात. असाच प्रकार गोकुळ शिरगाव परिसरातील अग्नी तांडवानंतर दिसला. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत परिसरात औद्योगिक क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. पंधरा हजारांहून अधिक कामगार दिवस-रात्र तीन शिफ्टमध्ये काम करतात. मात्र त्या परिसरात आग लागल्यानंतर कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील बंब, कोल्हापुरातील महानगरपालिकेचा बंब याचबरोबर विमानतळावरील बंब तातडीने मागवावा लागला. या सर्वांना पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडी आणि अंतर यामुळे काही प्रमाणात उशीर झाला. त्यामुळे तेथेच फायर स्टेशन होणे आवश्‍यक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
---------------
कोट
एखाद्या ठिकाणी आग लागल्यास साधारण चार-पाच मिनिटात फायर ब्रिगेडचा बंब त्या ठिकाणी पोहोचेल, असे नियोजन होत असते. मात्र गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अशी कोणतीही यंत्रणा नाही. आमचे बंब पोचण्यासाठी कालावधी जातो. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये फायर स्टेशन आहे. तेथे दोन बंब आणि १५ जवान २४ तास तैनात असतात. मात्र ही व्यवस्था केवळ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसाठीच पुरेशी आहे.
- सचिन नेरकर, स्थानक प्रमुख, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल
--------
एमआयडीसीने गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत एएम आठ आणि नऊ अशा दोन क्रमांकाचे सुमारे २५०० चौरस मीटर जागा ‘फायर स्टेशन’साठी आरक्षित आहेत. तेथे अपेक्षित निधी उपलब्ध नसल्यामुळे ‘फायर स्टेशन’ झालेले नाही. मात्र एमआयडीसीने त्यासाठी जागेची उपाय योजना पूर्वीच करून ठेवली आहे.
- राहुल भिंगार्डे; प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
------------
दृष्‍टिक्षेपात वसाहत
एकूण क्षेत्र :२१९ हेक्टर
इंडस्ट्रियल : ६४८ प्लॉट
कमर्शिअल : १७९
रेसिडिन्सी : १४
एकूण : ८४१
एकूण कामगार : १५,००० हजारांहून अधिक
---------------
तातडीने पूर्तता आवश्‍यक
आमदार, खासदार यांच्या निधीतून, औद्योगिक कंपन्यातील सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉबिलीटी) निधीतून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, राज्य शासनाकडे पाठपुरावा करून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये तातडीने फायर स्टेशनची पूर्तता करणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा एकदा अग्नितांडव होऊन जीवितहानी झाल्यावर पश्‍चाताप करण्यात अर्थ नाही.