किरीट सोमैय्या प्रेस बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरीट सोमैय्या प्रेस बातमी
किरीट सोमैय्या प्रेस बातमी

किरीट सोमैय्या प्रेस बातमी

sakal_logo
By

जावयासाठी ग्रामपंचायतींवर अन्यायी कर

किरीट सोमय्यांचा मुश्रीफ यांच्यावर आरोप : मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १६ ः स्वतःच्या जावयाला फायदा मिळवून देण्यासाठी माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायतींवर अन्यायी कर लावला. लोकांनी आक्रोश केल्यावर मुश्रीफांनी जुन्या तारखेचा आदेश काढून हा निर्णय मागे घेतला. हा कर का लावण्यात आला होता? याची चौकशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री करणार असल्याचे त्यांनी मला वचन दिले आहे. लवकरच यातील भ्रष्टाचार समोर येईल, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आज पत्रकार परिषदेत केला.
यावेळी सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्या जावयांनी पुण्यातील एक कंपनी विकत घेतली. पूर्वी ही कंपनी हॉस्टेल चालवण्याचे काम करायची. ज्यावेळी संपूर्ण राज्य लॉकडाउनमध्ये होते. त्यावेळी मुश्रीफांनी घरी बसून एक शासकीय आदेश काढला. या अंतर्गत ग्रामपंचायतींना जीएसटी व अन्य कर भरण्यासाठी एक सल्लागार कंपनी नेमण्याचे ठरले. या कंपनीला राज्यातील २७ हजार ८०० ग्रामपंचायतींनी वर्षाला ५० हजार रुपये द्यायचे. मुश्रीफांच्या जावयांनी घेतलेल्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. म्हणजे दरवर्षी ग्रामपंचयतींनी सुमारे १५० कोटी रुपये या कंपनीला द्यायचे. याबद्दल लोकांनी आक्रोश करायला सुरुवात केल्यावर हा सारा घोटाळा समोर आला. त्यानंतर मागील तारखेचा आदेश काढून मुश्रीफांनी हा शासकीय आदेश रद्द केला. या कंपनीला पूर्वी या कामाचा कोणताही अनुभव नव्हता. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी करण्याची विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनीही चौकशी करण्याचे वचन मला दिले आहे. मुश्रीफ स्वतःवरचे आरोप लपवण्यासाठी धर्माचा आधार घेत आहेत. रजत कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड, मौंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा आणि हसन मुश्रीफ यांच्या परिवाराचा काय संबंध आहे? ४९ कोटी ८५ लाख रुपये मुश्रीफ परिवाराच्या खात्यात आले. त्या संबंधी मुश्रीफ का बोलत नाहीत. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत, त्यामधून ही रक्कम कशी येते? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत.
यावेळी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, राहुल चिक्कोडे, सुनील कदम, सत्यजित कदम, हेमंत अराध्ये, अमोल पालोजी, अशोक देसाई उपस्थित होते.
------------

ठाकरे, राऊत का बोलत नाहीत?
खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईबाबत विचारले असतान सोमय्या म्हणाले, ‘गवळी, सरनाईक यांचा भ्रष्टाचार मी बाहेर काढला. त्यानुसार त्यांच्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी ज्यांच्याविरोधात तक्रार केली, त्यातील एकही तक्रार मी मागे घेतलेली नाही; पण उद्धव ठाकरे, संजय राऊत आता विरोधी पक्षात आहेत. मग ते गवळी आणि सरनाईक यांच्यावरील सुनावणीचा पाठपुरावा का करत नाहीत. ते याबद्दल सरकारला का विचारत नाहीत? कारण त्यांना माहिती आहे की जे काही झाले ते त्यांच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेनेच झाले.