
इचल : मजुरीवाढीची मागणी
यंत्रमाग कामगारांना १८.५९ पैसे मजुरीवाढ द्या
लालबावटा कामगार संघटनेची मागणी
इचलकरंजी, ता. १६ ः सन २०१३ च्या करारानुसार यंत्रमाग कामगारांच्या मजुरीत प्रती मीटर ५२ पिकास १८.५९ पैसे मजुरीवाढ करण्याची मागणी लालबावटा जनरल कामगार युनियनने केली आहे. याबाबतचे निवेदन सहायक कामगार कार्यालयात दिले आहे. जानेवारीअखेरपर्यंत जर मजुरीवाढीची घोषणा न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढप्रश्नी संघर्ष टाळण्यासाठी सन २०१३ मध्ये यंत्रमागधारक प्रतिनिधी व कामगार संघटना यांच्यात करार झाला होता. त्यानुसार दोन महागाई भत्ते एकत्र करून त्याचे पीसरेटमध्ये रूपांतर करून नवीन वर्षात मजुरीवाढ जाहीर करण्याचा निर्णय झाला होता. त्याची जबाबदारी सहायक कामगार आयुक्तांकडे सोपविण्यात आली होती. पहिली तीन-चार वर्षे त्यानुसार मजुरीवाढ जाहीर होण्याबरोबरच त्याची अंमलबजावणी केली होती, नंतर मात्र हा करार मान्य नसल्याची भूमिका यंत्रमागधारक प्रतिनिधींनी घेतली. त्यानंतर सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून दरवर्षी एकतर्फी मजुरीवाढीची घोषणा करण्यात येत आहे, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याची तक्रार कामगार संघटनांची आहे. नवीन वर्षात अद्याप मजुरीवाढीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाल बावटा कामगार युनियनने आज सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे निवेदन देऊन मजुरीवाढीची मागणी केली. २०२२ मध्ये जानेवारी ते जून या काळात ४०६ रुपये तर जुलै ते डिसेंबर या काळात ३४८रुपये इतका महागाई भत्ता वाढला आहे, तर महापालिका झाल्यामुळे परिमंडळात बदल झाला आहे. त्यानुसार ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण वाढ १३५४ रुपये इतकी झाली आहे.