घुबडाच्या अधिवासाला धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घुबडाच्या अधिवासाला धोका
घुबडाच्या अधिवासाला धोका

घुबडाच्या अधिवासाला धोका

sakal_logo
By

शहरात घुबडाच्या अधिवासाला धोका
संख्येत झपाट्याने घट; मोठी झाडे कमी होणे, रात्री वाढलेला प्रकाश मुळावर
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : शहरातील घुबडाचा अधिवास धोक्यात आला असून त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ढोली असणारी मोठी झाडे कमी होणे, रात्रीच्या वेळी वाढलेला प्रकाशाचा वापर, शहरालगत असलेली माळराने कमी होणे ही यामागची प्रमुख कारणे असल्याची निरीक्षणे पर्यावरण अभ्यासकांनी नोंदविली आहेत.
सध्या घुबडांना लागणाऱ्या अधिवासाचे संक्रमण गतीने सुरू आहे. घुबडे मोठ्या प्रमाणात न दिसण्याची कारणे अनेक आहेत. यांपैकी ढोली असलेली मोठी झाडे नष्ट होणे, शहरालगत असलेली माळराने, गवताचे पट्टे कमी होत जाणे, शहरालगत असलेल्या रिकाम्या जागांवर मानवी रहदारीत वाढ, विविध भागांतील रस्त्यांचे रुंदीकरण, अशी कारणे यात प्रामुख्याने आहेत. नागरीकरणामुळे निरुपयोगी जुनाट इमारती पाडून नवीन इमारतींची उभारणी गतीने सुरू आहे. अशावेळी भिंतीमधील पोकळ्या किंवा भोकांमध्ये घुबडांना लागणारा अधिवास नष्ट झाला आहे.
दुसरे असे की, घुबडाला गडद अंधार लागतो. सिटी लाईटस्‌चे प्रमाण शहरात सर्वत्र दिसते. परिणामी, जिथे घुबडांचा अधिवास आहे, तिथे सिटी लाईटस्‌चे प्रमाण वाढले आहे. घुबडांच्या सर्व प्रजाती या निशाचर आहेत. रात्रीच्या काळोखात त्यांना चांगले दिसते. शिवाय ते रात्रीच शिकार करतात. काही घुबडे संधिप्रकाशातही शिकार करतात; मात्र दिवे, प्रकाश वाढल्यामुळे घुबडांच्या प्रजाती स्थलांतरित होत असल्याचे निरीक्षण पक्षी निरीक्षकांनी नोंदवले आहे. शहर परिसरात ठिपकेवाला पिंगळा, गव्हाणी घुबड, धान्याच्या कोठाराजवळ आढळणारे घुबड, तिलकित घुबड, झाडांवर आढळणारे घुबड, कळंबा तलाव परिसरातील मासे खाणारे तपकिरी घुबड असे प्रकार आढळतात. कोल्हापूर जिल्ह्यालगत असलेल्या पश्‍चिम घाटात दहा ते ११ प्रकार आढळतात.
-----------
कोट‌
शहरात पूर्वी मोठ्या आकारांची झाडे होती. अशा झाडांच्या बुंध्यांवर नैसर्गिक ढोली असत. या ढोलीत घुबडांचा विणीचा हंगाम होत असे. आता ही झाडे दिसत नाहीत. परिणामी, घुबडांचे दिसणेही कमी झालेले पाहायला मिळते.
- रमण कुलकर्णी, वन्यजीव अभ्यासक.
------------
‘‘घुबडांची संख्या वाढवायची असेल, तर मोठ्या आकारमानाची झाडे लावली पाहिजेत आणि घुबडे निवांतपणे भक्ष्यांची टेहळणी करू शकतील, असे मचाण उभे केले पाहिजे. यातून घुबडांची संख्या वाढेल व उंदीर, घुशी, साप, पाली, सरडे, निरुपद्रवी किटकांची संख्याही कमी होईल; पण हे प्रत्येकाने करायलाच हवे. दुसरा पर्याय नाही.’’
- सुहास वायंगणकर, पर्यावरण अभ्यासक.
------------
चौकट
दृष्टिक्षेपात
मादी झाडाच्या खोडात किंवा ढोलीत अंडी घालते
भारतात घुबडांच्या ६० प्रजाती-उपप्रजाती
घुबडाचा जीवनकाल सरासरी २५ वर्षे
हा पक्षी स्वत:चे घरटे बांधत नाही
सर्वांत छोटे घुबड एल्फ आऊल
सर्वांत उंच घुबड ग्रेट ग्रे आऊल.