आवश्यक असेल तरच उपसाबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक असेल तरच उपसाबंदी
आवश्यक असेल तरच उपसाबंदी

आवश्यक असेल तरच उपसाबंदी

sakal_logo
By

GAD178.JPG
76303
गडहिंग्लज : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बोलताना राजेश पाटील. शेजारी स्मिता माने, अमर चव्हाण, सुनिल शिंत्रे, राजेश पाटील-औरनाळकर, रियाज शमनजी, संतोष पाटील.
-------------------------------------------------
आवश्यक असेल तरच उपसाबंदी
बैठकीत निर्णय : ‘चित्री’तील पाण्याचे गडहिंग्लज पाटबंधारेतर्फे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : चित्री मध्यम प्रकल्पातील पाण्याचे आवर्तन हिरण्यकेशी नदीत सोडल्यानंतर ते पाणी शेवटच्या लाभक्षेत्रापर्यंत गतीने जाण्यासाठी आवश्यक असेल तरच उपसाबंदी करण्याचा निर्णय आजच्या चित्री प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीच्या अध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता स्मिता माने अध्यक्षस्थानी होत्या.
आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरण्यकेशी पाटबंधारे कार्यालयात ही बैठक झाली. उपअभियंता डी. आर. धोंडफोडे यांनी पाण्याची आजची स्थिती सांगितली. माने यांनी रब्बी व उन्हाळी शेतीपिकासाठी २० जानेवारीपासून मे अखेरपर्यंत चित्रीतील पाण्याचे पाच आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. आमदार पाटील म्हणाले, ‘यावर्षीही सक्तीची उपसाबंदी लादणार नाही. सर्फनाला, किटवडे धरणामुळे आजऱ्‍यातील सिंचन क्षेत्रही भविष्यात वाढेल. शेतीसाठी कमतरता भासणार नाही इतके पाणी उपलब्ध आहे. शेतकऱ्‍यांनी मात्र पाणीपट्टी वेळेत भरावी. पाटबंधारेने उपसाबंदीचे नियोजन केले असले तरी त्याची आवश्यक असेल तरच अंमलबजावणी केली जाईल.’
केडीसीसीचे संचालक संतोष पाटील, विकास मोकाशी, सुनिल शिंत्रे यांनी पाणीसाठा मुबलक असल्याने दरवर्षी पाणी शिल्लक राहत असून खणदाळ, नांगनूर, अरळगुंडी, इदरगुच्ची, कडलगे ही गावे कायमस्वरुपी लाभक्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी केली. आजऱ्‍याचे विनय सबनीस यांनी पाणी परवाना नुतनीकरणासाठी विशेष मोहिम राबवण्यासह पाणी साठ्याची क्षमता पाहूनच लाभक्षेत्र निश्‍चित करण्याचे सूचित केले. राजेंद्र गड्ड्यान्नावर यांनी उपसाबंदी करायची असेल तर वीज महावितरणशी समन्वय साधण्याची सूचना केली. बैठकीत राजेश पाटील-औरनाळकर, रियाज शमनजी, आप्पासाहेब गडकरी, रमेश आरबोळे, अमर चव्हाण, जयसिंग चव्हाण, शिवप्रसाद तेली, महाबळेश्‍वर चौगुले आदींनी सूचना मांडल्या. कालवा निरीक्षक प्रविण पाटील यांनी स्वागत केले. शाखा अभियंता श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. शेतकरी व पाटबंधारेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
------------------
* पावसाचे पाणी वेळेत अडवा
अमर चव्हाण म्हणाले, ‘दरवर्षी पावसाळ्यानंतर अडवलेला पाणीसाठा जानेवारी अखेरपर्यंत पुरत होता. यंदाच्या नियोजनाला उशिर झाल्याने १५ दिवस आधीच आवर्तन सोडावे लागत आहे. अधिकाऱ्‍यांनी याकडे गांभीर्याने पहावे. पाटबंधारेकडे रिक्त असलेले उपअभियंता व शाखा अभियंत्यांचे पद तातडीने भरावे. कायमस्वरुपी अधिकारी येईपर्यंत हिरण्यकेशी शाखेसाठी स्वतंत्र व्यक्तीकडे कार्यभार सोपवावा.’