वीज बिल भरले हेच चुकले का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज बिल भरले हेच चुकले का?
वीज बिल भरले हेच चुकले का?

वीज बिल भरले हेच चुकले का?

sakal_logo
By

वीज बिल भरले हेच चुकले का?
पाणी योजना थकबाकी माफीचा निर्णय; प्रोत्साहन लाभाची ग्रामपंचायतींची मागणी
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : दैनंदिन खर्चात काटकसर करून, प्रसंगी ग्रामस्थांच्या अन्य सुविधांकडे दुर्लक्ष करून पाणीपुरवठा योजनांची वीज बिले वेळच्यावेळी भरली. वीज बिलाची थकबाकी कायम शून्यावर ठेवण्याचे अवघड काम पार पाडले. पण, आता शासनाने जून २०२२ पूर्वीची थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सांगा आमचे काय चुकले, असे म्हणण्याची वेळ प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्रामपंचायतींवर आली आहे. शेतकरी कर्जमाफीप्रमाणे प्रोत्साहन लाभ देण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायतींमार्फत गावागावांत पाणीपुरवठा योजना राबवल्या आहेत. मात्र, या योजनांची देखभाल दुरुस्ती व वीज बिले भागवताना ग्रामपंचायतींना नाकीनऊ आले आहे. वीज बिल थकबाकीच्या रकमांचा आकडा महिन्यागणिक वाढतच जात आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनी आर्थिक संकटात आली आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ओटीएस योजना आणली आहे. याअंतर्गत ग्रामविकास विभाग पाणी योजनांच्या जून २०२२ पूर्वीच्या थकबाकीची मुद्दल महावितरणला देणार आहे. महावितरणकडून मुद्दलावरील व्याज व विलंब आकार माफ केला जाणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे वीज बिलाच्या बोजाखाली दबलेल्या ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायतींनी प्रामाणिकपणे दरमहा वीज बिलाची रक्कम भरली आहे. कायम शून्य थकबाकी कशी राहिल याकडे लक्ष दिले आहे. त्यासाठी प्रसंगी गावातील अन्य सुविधांकडे दुर्लक्ष केले. अशा ग्रामपंचायतींवर अन्याय करणारा हा निर्णय आहे. गडहिंग्लज तालुक्याचाच विचार केल्यास १६ ग्रामपंचायतींची थकबाकी शून्य आहे. त्यांनी प्रामाणिकपणे वीज बिल भरले हा गुन्हा झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींनाही दिलासा देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांप्रमाणे प्रोत्साहन लाभ देण्याची मागणी होत आहे.
---------------
* गडहिंग्लजच्या या ग्रामपंचायतींची शून्य थकबाकी
हेब्बाळ जलद्याळ, हुनगिनहाळ, इंचनाळ, जखेवाडी, जांभूळवाडी, खणदाळ, हणमंतवाडी, हरळी बुद्रुक, माद्याळ कसबा नूल, मांगनूर तर्फ सावतवाडी, मुगळी, नांगनूर, शिंदेवाडी, सावतवाडी तर्फ नेसरी, तनवडी, तेरणी.
--------------
पाणीपुरवठा योजनेच्या थकबाकीवर व्याज वाढू नये यासाठी वीज बिल भरले. थकबाकी शून्यावर आणली. आता शासनाने थकबाकी माफीचा निर्णय घेतला आहे. आम्ही प्रामाणिकपणे वीज बिल भरले ही चूक झाली का? शासनाने कर्जमाफी योजनेत प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ दिला त्याच पद्धतीने प्रामाणिक ग्रामपंचायतींनाही लाभ द्यावा.
- विकास मोकाशी, उपसरपंच
नांगनूर, ता. गडहिंग्लज