
११ ठिकाणी गृहे
महिला स्वच्छतागृहांची
पाच कामे सुरू
सहा ठिकाणी होतोय विरोध
कोल्हापूर, ता. १७ : महिला व बाल कल्याण विभागाच्या निधीतून केशवराव भोसले नाट्यगृह, गांधी मैदान विभागीय कार्यालय, केएमसी कॉलेज, मध्यवर्ती बसस्थानक, ताराबाई उद्यान येथे महिलांसाठी स्वच्छतागृहाची कामे सुरू करण्यात येत असल्याचे महापालिकेने कळवले आहे. याशिवाय सहा ठिकाणच्या कामांना नागरिकांचा विरोध असल्याने ती थांबवली आहेत.
आतापर्यंत महिला बालकल्याण विभागातर्फे शहरातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ, भाजी मंडई, बसथांबे या ठिकाणी वॉश बेसिनसह दोन युनिटची स्वच्छतागृहे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी यल्लमा मंदिर ओढा, शाहू खासबाग मैदान, रंकाळा रोड, जयप्रकाश नारायण उद्यान, रंकाळा चौपाटी, रंकाळा पदपथ, टाऊन हॉल बसस्टॉप, बिंदू चौक पार्किंग, मेरी वेदर ग्राऊंड, राज कपूर पुतळा बाग, जनता बाजार चौक येथे महिलांसाठी स्वच्छतागृह बांधून त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. राजाराम चौक चॅनेल जवळ, टिंबर मार्केट भाजी मंडई जवळ, साकोली कॉर्नर रोड चॅनेलवर, पद्माराजे हायस्कुल मुलींची शाळेच्या चॅनेल लगत, करवीर वाचन मंदीर मेन राजाराम आतील बाजू या ठिकाणी नियोजन करण्यात आले होते. ठेकेदारांमार्फत काम सुरू करण्यात आले होते. स्थानिक व परिसरातील व्यापाऱ्यांचा विरोध होत असल्याने काम पूर्ण करता आले नाही. रोटरी स्मार्ट सिटी कोल्हापूर व जाधव इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त माध्यमातून अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहाचे कामही स्थानिक अडचणींमुळे स्थगित करण्यात आले आहे.
याशिवाय महापालिकेने ५४६३ घरांमध्ये वैयक्तिक शौचालय बांधून दिली आहेत. ड्रेनेज लाईन टाकून वैयक्तिक शौचालये तिला जोडण्याचा खर्च पालिकेने केला आहे. यासाठी तीन कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. यामुळे ३८० सार्वजनिक शौचालयांपैकी १४० शौचालये बंद झाली आहेत. अस्तित्वात असणारी सार्वजनिक शौचालय दुरुस्तीसाठी दीड कोटीपेक्षा जास्त खर्च केला आहे.