पंचमुखी गणेश मंदिरातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचमुखी गणेश मंदिरातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
पंचमुखी गणेश मंदिरातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

पंचमुखी गणेश मंदिरातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

sakal_logo
By

शहरात गणेश जयंतीची धूम
बुधवारी मुख्य दिवस, आठवडाभर विविध सामाजिक उपक्रमांवर भर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : नववर्षातील मकर संक्रांतीच्या सणानंतर आता शहराला गणेश जयंतीचे वेध लागले आहेत. बुधवारी (ता. २५) गणेश जयंतीचा मुख्य दिवस असला तरी तत्पूर्वी आठवडाभर आणि त्यानंतर आठवडाभर अशी पंधरा दिवस या धार्मिक सोहळ्याची धूम राहणार आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच यंदाही गणेश मंदिर व्यवस्थापनांतर्फे विविध सामाजिक उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.

पंचमुखी गणेश मंदिरातर्फे
पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर
शाहूपुरी, कुंभार गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश सेवा भक्त मंडळातर्फे पंचमुखी गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, ‘‘गणेश जयंती २५ जानेवारीला आहे. गणेश जयंतीच्या सप्ताहाची सुरुवात २० तारखेपासून होईल. २० ते २६ पर्यंत धार्मिक कार्यक्रम होतील. १९९५ मध्ये स्थापन केलेल्या पंचमुखी गणेश मंदिरास यावर्षी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी जन्मकाळ सोहळा साजरा होतो. २६ रोजी महाप्रसादाचे वाटप होईल. मंडळातर्फे यावर्षी रक्तदान शिबिर, फुले, हार, हराटी अशा निर्माल्यापासून खत निर्मिती करणे, धार्मिक ग्रंथालय आणि वाचनालय उभे करणे, बायोगॅसपासून सहयंत्र बनवणे, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे, शाहूपुरी भागात येणाऱ्या पुरापासून संरक्षणासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारणे, गरजूंसाठी प्राथमिक उपचार केंद्राची उभारणी, मंदिर फाउंडेशनतर्फे ॲम्ब्युलन्स सेवा, दंतचिकित्सा केंद्र सुरू करणे असे नियोजित उपक्रम राबवण्यात येणार आहेत.’’
यावेळी उपाध्यक्ष उदय कुंभार, उत्सव समिती अध्यक्ष शुभम कुंभार, उपाध्यक्ष ओंकार पाटील, सचिव अरविंद जाधव, खजानिस शिवाजी बावडेकर, सतीश वडणगेकर, राजेश पठाण, उदय डवरी, अजय पाटील, सतीश कुंभार आदी उपस्थित होते.

शिवगणेश मंडळातर्फे
दिव्यांगांना शैक्षणिक मदत
शुक्रवार पेठेतील श्री शिवगणेश मंडळातर्फे बुधवार (ता. २५) पासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. दिवसभर जन्मकाळासह विविध धार्मिक विधी होतील. सायंकाळी सहाला भव्य पालखी सोहळा होणार असून शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषेत मंडळाचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होतील. सलग पाच दिवस मंडळातर्फे आरोग्य शिबिरांसह सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या १९ दिव्यांग मुलांना शिक्षणासाठी आवश्यक नवीन कपड्यांबरोबरच इलेक्ट्रिक युएसबी उपकरणांसह बस पासेसचेही वितरण केले जाणार आहे. दोनशे साठ ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना नवीन कपडे दिले जाणार आहेत. सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, गुणवंतांचा सत्कार, महाप्रसाद आदी कार्यक्रमही होणार आहेत.