
आजरा ः टस्कर मस्त, शेतकरी त्रस्त भाग - 5
मालिका लोगो मुख्य अंक २ वरून
---
हत्तींचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘त्रिसूत्री’
-
आमदार प्रकाश आबिटकर यांची माहिती
आजरा, ता. १८ ः आजरा व चंदगड तालुक्यात धुडगूस घालणाऱ्या टस्कर हत्तींचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रश्नात व्यक्तीशः लक्ष घातले असून शेतकऱ्यांना जास्तीतजास्त पीकनिहाय नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले आहेत. शेतकरी, वनाधिकारी यांच्याबरोबर अनेकदा बैठका घेतल्या आहेत. याबाबत ठोस उपाययोजना कशा करता येतील यासाठी तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू आहे. टस्कराला जंगलात खाद्य व पाणी मुबलक देऊन त्यांना जंगलात रोखणे, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन घाटकरवाडी येथे हत्ती संगोपन केंद्र उभारणे, हत्ती जेथून महाराष्ट्रात येतात ते येऊ नयेत यासाठी पायबंद घालणे या त्रिसूत्रीवर भर दिल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
आजरा तालुक्यातील पश्चिम भागात हत्तींकडून उपद्रव सुरू आहे. नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्याला रोखण्यासाठी वनविभागाकडून तात्पुरत्या व पारंपरिक उपाययोजना केल्या जात आहेत. वनविभागाकडूनही त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी पथक नेमले आहे. मात्र, या गोष्टीमुळे हत्तीचा प्रश्न सुटेल असे नाही. त्यासाठी ठोस उपाययोजनांचा अवलंब करावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात पीक नुकसानभरपाई वाढवून घेतली आहे. शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. हत्ती या जंगलात स्थिरावला आहे. मात्र, त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यावहारिकदृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. तो जंगलात कसा राहील. त्याला तेथे खाद्य व पाणी कसे मुबलक मिळेल यासाठी प्राथमिक पातळीवर प्रयत्न गरजेचे असून, त्यादृष्टीने वनविभागाला सूचना दिल्या आहेत. हत्तींना रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याबाबत शासन विचारधीन आहे.